• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान; प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे सुरू

Jun 30, 2025

Loading

*रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान; प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे सुरू*

जळगाव, दि. 30 जून (जिमाका): रावेर तालुक्यात रविवारी 29 तारखेस सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने शेतकऱ्यांना जबरदस्त फटका दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
वादळामुळे रावेर तालुक्यातील तब्बल ३१ गावे प्रभावित झाली असून, सुमारे ६८६ शेतजमिनींवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या केळी पिकांचे नुकसान झाल्याचे महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.
वादळाची तीव्रता इतकी होती की अनेक ठिकाणी केळीचे झाडे उन्मळून पडले, फळे गळून गेली आणि काही ठिकाणी शेताचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने तात्काळ महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांना पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले असून, काही भागांत प्रत्यक्ष पंचनाम्याचे काम सुरूही करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed