अमळनेरमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न: एका बाजूला टंचाई, तर दुसरीकडे हजारो लीटर पाण्याची नासाडी!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरामध्ये पाण्याच्या टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो, तोही वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अनेक कॉलनींमध्ये रहिवासी टँकरच्या आशेवर आहेत. या सगळ्यांमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सुरभी कॉलनीमधील वाघ मॅडम यांच्या घराशेजारी गेल्या दीड महिन्यांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तिथे पाईपलाईन फुटली असावी किंवा गळतीमुळे हे पाणी अखंड वाहत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असतानाही नगरपरिषद याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
सामान्य नागरिकांना ८-१० दिवसांतून एकदाच पाणी मिळत असताना काही ठिकाणी अशी उधळपट्टी होणे दुर्दैवी आहे. या गळतीकडे प्रशासनाने वेळेवर लक्ष दिले असते, तर लाखो लिटर पाणी वाचले असते. आता सुज्ञ नागरिकांचा सवाल आहे — “नगरपालिका नेमकी कुणाच्या हितासाठी काम करत आहे?”
या प्रकरणात संबंधित ठेकेदार किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी जोर धरली आहे. अन्यथा हे आंदोलनाचे रूप घेऊ शकते, अशीही चेतावणी नागरिकांनी दिली आहे.