“जवान चंदू चव्हाण यांच्या न्यायासाठी झुंजणार! – दीपक पाटील (वाघोदे) यांची भूमिका ठाम”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानाला न्याय मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे युवा नेते दीपक पाटील (वाघोदे) यांनी पुढाकार घेतला आहे. धुळे जिल्ह्यातील जवान चंदू चव्हाण हे काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये अडकले होते. एका दुर्भाग्यपूर्ण विमानतळ घटनेत चुकून सीमापार गेलेल्या चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर त्यांच्या भवितव्याबाबत सरकारने पुन्हा मौन बाळगले आहे.
दीपक पाटील म्हणाले, “ज्यांनी देशासाठी सेवा केली, त्यांना सरकारकडून नोकरीसारखा मूलभूत हक्क मिळायला हवा. आंदोलने, उपोषणं झाली, तरी सरकारने याकडे दुर्लक्ष केलं हे खेदजनक आहे. जर सरकार प्रचारासाठी त्यांचा वापर करू शकते, तर न्याय का नाही देऊ शकत?”
यासंदर्भात एक गंभीर आरोपही करण्यात आला आहे की, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जेव्हा धुळे-जळगाव परिसरात कार्यक्रमासाठी येतात, तेव्हा चंदू चव्हाण यांना मुद्दाम रोखलं जातं — जेणेकरून ते आपल्या हक्कासाठी सभा स्थळी पोहोचू शकू नयेत. ही बाब जवानांच्या आत्मसन्मानाशी थेट जोडलेली असल्याने ती अधिक वेदनादायी आहे.
महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक पाटील आता या संपूर्ण प्रकरणात चंदू चव्हाण यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, लवकरच या संदर्भात सरकारवर ठोस दबाव टाकण्याचे आंदोलन उभे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
“देशाच्या रक्षणासाठी उभं असणाऱ्या जवानांशी अन्याय होत असेल, तर तो संपूर्ण समाजासाठी शरमेची बाब आहे,” – असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.