आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी
अमळनेर :
येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी बघावयास मिळाली.
आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला जातात. मात्र काही भाविक विविध अडचणींमुळे विठुरायाच्या भेटीला जाऊ शकत नाही. त्यांचा भक्तिभाव जाणून येथील श्री मंगळग्रह मंदिरात आकर्षक सजावट करुन श्री मंगळग्रह देवतेला विठुरायाचे रुप दिले होते. हे रुप डोळ्यात साठविण्यासाठी अमळनेरसह चोपडा, धरणगाव, पारोळा, शिरपूर, धुळे आदी तालुक्यांतील भाविकांनी श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.
श्री मंगळग्रह मंदिरातील गाभाऱ्यातील श्री मंगळग्रह देवतेसोबतच श्री भूमिमाता व श्री पंचमुखी हनुमान यांच्या मुर्त्यांभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिवाय तुळसाई बागेतील कारंजा सर्वांना मोहित करत होता. त्यामुळे मंदिर परिसरात नवचैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक भाविकांनी श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील नैसर्गिक वातावरणात उपवासाच्या पदार्थांचा आनंद लुटला. शिवाय काही भाविकांनी आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत पूजा-अभिषेकही केला.