• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न – डॉ. गोऱ्हे यांचा टोला*

Jul 6, 2025

Loading

*लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न – डॉ. गोऱ्हे यांचा टोला*

पुणे, येरवडा (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
“लाडकी बहीण योजनेविषयी विरोधक अपप्रचार करत आहेत, अफवा पसरवत आहेत. या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली.

या वेळी त्या शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्या पुढाकारातून येरवडा, जनतानगर नवी खडकी येथे सुरू करण्यात आलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. यावेळी नागरिकांसाठी छत्री वाटप आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. गोऱ्हे यांनी शिबिराला भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली.

कार्यक्रमाला शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, उपशहरप्रमुख सुनील जाधव, महिला आघाडी संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, तसेच माजी नगरसेविका सुरेखा कदम उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भगिनींसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी मदत मिळत आहे. मात्र, या योजनेवरून विरोधकांनी जाणीवपूर्वक खालच्या थराला जाऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. परंतु जनतेने त्यांच्या या अपप्रचाराला प्रतिसाद दिला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी याचे उत्तर दिले आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती व शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच त्या म्हणाल्या, “मी येरवडा भागात अनेकदा आले आहे आणि प्रत्येक वेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवला आहे. आजही आनंद गोयल यांच्या या कार्यक्रमाला झालेली उपस्थिती पाहून मनःपूर्वक समाधान वाटते.”

येरवडा भागातील महिलांसाठी त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की,
“महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक शुक्रवारी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच महिलांसाठी संगणक, माहिती पुस्तिका आणि अन्य प्रशिक्षण साहित्य खरेदीसाठी माझ्या आमदार निधीतून ₹१० लाखांचा निधी देत आहे. या माध्यमातून अधिकाधिक महिला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर व्हाव्यात,” असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *