“रुग्णांसाठी नवसंजीवनी! सचिन दादा पाटील यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणास सज्ज”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हार, केक किंवा फटाक्यांची धामधूम न करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन भूमिपुत्र आमदार अनिल दादा पाटील यांचा वाढदिवस एक आगळीवेगळी प्रेरणा घेऊन साजरा केला जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील (दादा) यांनी स्वखर्चाने एक अत्याधुनिक रुग्णवाहिका तयार करून तिच्या लोकार्पणाचा मानस केला आहे.
या उपक्रमामुळे शिरपूर मतदारसंघातील अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणार असून, आरोग्य सेवेसाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.
—
नेत्याच्या प्रेरणेतून समाजसेवेचा वसा
७ जुलै रोजी आमदार अनिल दादा पाटील यांचा वाढदिवस असून, नेहमीच जनतेच्या सेवेस तत्पर असलेल्या या लोकप्रिय नेत्याच्या प्रेरणेतूनच हा समाजोपयोगी निर्णय घेतल्याचे सचिन दादा पाटील यांनी स्पष्ट केले.
अपघातांची वाढती संख्या, १०८ रुग्णवाहिकेवरील ताण आणि अडचणीच्या वेळेस उपलब्ध सेवा न मिळण्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः रात्रीच्या वेळेस रुग्णवाहिका मिळण्यात अडथळे येत असल्याने काहीवेळा दुर्दैवी घटना घडल्याच्याही नोंदी आहेत.
—
२४ तास उपलब्ध सेवा – नफाविना निस्वार्थ उपक्रम
या रुग्णवाहिकेची सेवा २४ तास उपलब्ध राहणार असून, इको चारचाकी वाहनात सज्ज करण्यात आलेली ही गाडी (क्रमांक: CHK-54-9099), आमदार अनिल दादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर उभी राहणार आहे. गरजूंनी त्वरित संपर्क साधता यावा यासाठी एक संपर्क क्रमांकही प्रसिद्ध केला जाणार आहे.
सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे या गाडीचा इंधन खर्च, चालकाचा मानधन आणि देखभाल हे सर्व सचिन दादा पाटील स्वतःच्या खर्चातून करणार आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
—
गरजूंना नवा आशेचा किरण
अलीकडेच रस्त्यावर प्रसूती झाल्याच्या घटनेनंतर या रुग्णवाहिकेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली. अशा अडचणीच्या प्रसंगी ही रुग्णवाहिका जनतेसाठी खऱ्या अर्थाने ‘जीवनदायी यंत्र’ ठरणार आहे. असे राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले