
हर्षल बोरसे यांची विद्यापीठ अभ्यास मंडळावर नियुक्ती; शैक्षणिक, औद्योगिक व साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
हर्षल बोरसे यांची विद्यापीठ अभ्यास मंडळावर नियुक्ती; शैक्षणिक, औद्योगिक व साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर येथील सुपुत्र आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे उद्योजक हर्षल बोरसे यांची नुकतीच पुणे येथील स्वायत्त एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Autonomous) या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांची सेवा लक्षवेधी ठरली असून, या नियुक्तीने त्याच्या कार्याचा गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
हर्षल बोरसे यांनी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पुणे येथे Assistant Professor म्हणून कार्य केले आहे. याच संस्थेच्या अभ्यास मंडळावर त्यांची आता पुन्हा नियुक्ती झाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
व्यवसाय क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. ते ग्रीन ग्लोब व रायझिंग भारत बायोकेअर या कृषी जैविक उत्पादक कंपन्यांचे तसेच रायल एलीट बांधकाम कंपनी, पुण्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
हर्षल बोरसे यांचे मूळ गाव अनवर्दे खुर्द (ता. चोपडा) असून, त्यांचे वडील गुलाबराव बोरसे हे नवभारत माध्यमिक विद्यालय, दहीवद येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, तर आई मंगलाताई बोरसे या जिल्हा परिषदेमध्ये आदर्श मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.
त्यांच्यावर लहानपणापासूनच घरातील शैक्षणिक वारसा आणि मूल्यांचा ठसठशीत प्रभाव आहे.
हर्षल बोरसे यांची ही नियुक्ती म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांनी चिकाटी, प्रामाणिकता व अभ्यासाच्या बळावर शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात उंच भरारी घेता येते, याचे ज्वलंत उदाहरण आहे.
या यशाबद्दल साहित्य, शिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.