
वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग यांचं थकीत मानधन त्वरित द्या! — तहसीलदारांना निवेदन सादर
वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग यांचं थकीत मानधन त्वरित द्या! — तहसीलदारांना निवेदन सादर
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत येणाऱ्या वृद्ध, विधवा महिला, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांचे सात महिन्यांपासून मानधन थकीत आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करून तत्काळ वितरण करण्याची मागणी करण्यात आली.
नियमितपणे आधार व केवायसी लिंक असतानाही अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होत नाही. परिणामी अनेक वयोवृद्ध व निराधार महिलांना तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, संबंधित खात्यातील कर्मचाऱ्यांकडून योग्य माहिती न मिळाल्याने वयोवृद्ध व दिव्यांग यांना हाल सोसावे लागत आहेत, अशी तक्रार करण्यात आली.
या समस्येमुळे लाभार्थ्यांचे दैनंदिन जीवन कठीण झाले असून, त्यांना जीवनावश्यक गरजाही भागवता येत नाहीत. तुरुंगासारख्या अवस्थेत जगणाऱ्या या लाभार्थ्यांची वेदना अधिक खराब झाली आहे.
याबाबत माहिती फलक कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावावा आणि संबंधित विभागाशी समन्वय साधून थकीत मानधन तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र रामदास ढोले यांना देण्यात आले. यावेळी मौलाना रियाज शेख (अध्यक्ष – स्वतंत्र सेनानी अल्लामा फज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररी, सुन्नी दारुल क़ज़ा) यांच्यासह मनोज मोरे, विनोद जाधव, रामेश्वर तांडा, कमर दादा, सुरेश चव्हाण, कैलास पवार, भुरा जाधव, नारायण भाऊ, प्रमिला पाटील, नुरखा पठान, चतुर पवार, आशा पाटील यांच्यासह अनेक वयोवृद्ध लाभार्थी उपस्थित होते.
📝 मुद्देसूद मागण्या :
7 महिन्यांचे थकीत मानधन त्वरित वितरित करावे
लाभार्थ्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी फलक लावण्यात यावा
केवायसी पूर्ण असूनही निधी न मिळण्यामागील कारणे स्पष्ट करावीत
तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरू करावा