
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले
अमळनेर | प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी अमळनेर शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह इतर शासकीय विभागातील अधिकारीवर्ग सकाळी अंबर्षी टेकडीवर एकत्र जमले. त्यांनी मॉर्निंग वॉकचा आनंद घेत निसर्गाशी संवाद साधला, तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षलागवड केली.
ही वृक्षलागवड अंबर्षी टेकडी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. अधिकाऱ्यांच्या हस्ते विविध सावली व औषधी झाडांची लागवड करण्यात आली. निसर्गाच्या सान्निध्यात हा एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.
या प्रसंगी टेकडी ग्रुपचे सर्व मावळे मोठ्या उत्साहात उपस्थित होते. “प्रत्येक नागरिकाने सकाळी थोडा वेळ निसर्गासाठी द्यावा आणि पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे,” अशी भावना ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली.
“अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो आणि वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित होते,” असा विश्वास टेकडी ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आला. शासकीय अधिकाऱ्यांचा हा सहभाग तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला.