• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

यशवंत हाप्पेनी केलेल्या महाराष्ट्राच्या सेवेचे ऋण कुणीच फेडू शकणार नाही-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार

Jul 11, 2024

Loading

यशवंत हाप्पेनी केलेल्या महाराष्ट्राच्या सेवेचे ऋण कुणीच फेडू शकणार नाही-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार

मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे)

राजकारणात एवढ्या उत्तुंग माणसाचे स्वीय सहाय्यक असताना स्वतःचा कुठलाही स्वार्थ न साधता ५०-५२ वर्ष वसंतदादांची सेवा करण्याचे काम यशवंत हाप्पे यांच्या हातून झाले हे आपल्यासाठी दिशादर्शक आहे. हाप्पे यांनी वसंतदादांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी सेवा केलीय त्याचे ऋण कुणीच फेडू शकत नाही, असे गौरवोद्गार भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काढले.

यशवंतराव प्रतिष्ठान येथे यशवंत हाप्पे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. दरेकर बोलत होते. याप्रसंगी सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, माध्यम सल्लागार जयू भाटकर, आमदार सत्यजित तांबे, खासदार विशाल पाटील मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक नंदकुमार काटकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघांचे माजी अध्यक्ष वसंतराव शिंदे, कामगार नेते दिवाकर दळवी, राष्ट्रवादीचे बसवराज पाटील, मुंबई गृहनिर्माण फेडरेशनचे सेक्रेटरी डी. एस. वडेर, पी.आर. पाटील, निमंत्रक भाई सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, यशवंत हाप्पे यांच्या कार्यक्रमाला येऊन त्यांच्याप्रती अजूनही लोकांच्या मनात सदभावना आहेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपस्थितीतून दर्शवायचे होते म्हणून आवर्जून त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी मी येथे उपस्थित आहे. हाप्पे यांच्यावर मी भरभरून बोलेन. राजकारणात राहून एवढं सरळ राहणे सोपं नसते. राजकारणात एवढ्या उत्तुंग माणसाचे स्वीय्य सहाय्यक असताना स्वतःचा कुठलाही स्वार्थ न साधता ५०-५२ वर्ष त्यांनी वसंतदादांची सेवा करण्याचे काम हाप्पे यांच्या हातून झाले हे आपल्यासाठी दिशादर्शक आहे. हाप्पे यांनी वसंतदादांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी सेवा केलीय त्याचे ऋण कुणीच फेडू शकत नाही. एवढ्या निरागस भावनेने यशवंत हाप्पे यांनी काम केल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, छत्रपतींचा महाराष्ट्र हा पुण्याईवर जगतोय. आमच्या पक्षाचा उमेदवार पडल्याचे दुःख आहेच पण ज्या वसंतदादा पाटील यांचे योगदान महाराष्ट्रासाठी आहे त्यांच्या नातवाला आशीर्वाद देऊन दादांची पुण्याई अजून जिवंत आहे हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने दाखवून दिले आहे. सत्यजित तांबे यांनीही तेच केले. उमेदवारी मागितली नाही दिली. लढले आणि जिंकले. महाराष्ट्राची माती ही बंडखोरीचे नेहमीच स्वागत करते. तुमच्या मागे भावना चांगली असेल, विचाराप्रति निष्ठा असेल तर अशा बंडाला राज्यातील जनतेने नेहमीच साथ दिल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले की, हाप्पे यांनी ५० वर्ष सेवा करत असताना स्वतःसाठी खूप काही करू शकले असते. मुंबईत जागा घेऊ शकले असते, संस्था उभ्या करू शकले असते. त्यांनी अनेक आमदार, मंत्री घडवले, स्वतःसाठी मात्र कधीच त्यांनी काही मागितले नाही. त्यामुळे त्यांच्याप्रति नेहमीच वेगळा आदर असल्याचे दरेकर म्हणाले. यावेळी दरेकरांनी हाप्पे यांच्या विरोधात मुंबई बँकेची निवडणूक लढवल्याची आठवणही सांगितली. तसेच हाप्पे आणि माझे संबंध पहिल्या दिवसापासून होते ते आजही कायम आहेत. कुठलाही दुरावा आला नाही.

तसेच वसंतदादा पाटील आणि हाप्पे यांचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत. वसंतदादा मुख्यमंत्री असताना हाप्पे यांनी स्वतःच्या पदरात अनेक गोष्टी पाडून घेतल्या असत्या पण हा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. उलटपक्षी जो गांजलेला, पीडित आहे त्यांना ते दादांना भेटवत. अशा तपस्वी, सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या स्वीय सहाय्यकाचा आज सत्कार होतोय. आज जे स्वीय सहाय्यक म्हणून काम करताहेत त्यांच्यासाठी हा सत्कार आदर्श आहे. आपल्याला हाप्पे होता आले नाही पण त्यांच्यासारखे उपेक्षित, गरीब समाजासाठी करता येईल का? हा प्रयत्न जरी केला तर या कार्यक्रमाचे फलित होईल, असेही दरेकर म्हणाले.

*वसंतदादांप्रती आदर व्यक्त*

*करणे हे आमचे कर्तव्य आहे*

दरेकर म्हणाले की, वसंतदादांची आठवण आपल्याला झालीच पाहिजे. विधिमंडळात सहकाराच्या भाषणात बोलताना वसंतदादांच्या नावाने ज्याज्या संस्था आहेत त्यासाठी सरकारला धारेवर धरले होते. ज्या वसंतदादांनी एवढे मोठे वैभव उभे केले त्यांच्या नावाने संस्था आहेत त्या बंद का आहेत? त्यांना ताकद दिली पाहिजे, त्या जगवल्या पाहिजेत. कारण त्यामागे त्यांचा व्यापक उद्देश होता. जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळी वसंतदादांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचण्याचे काम माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने सातत्याने केले आहे. अशा कर्तृत्ववान नेत्याची आठवण, आदर व्यक्त करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे उद्गारही दरेकरांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed