स्त्री -शुद्रांच्या पशूतुल्य जीवनातील प्रकाश वाटा प्रशस्त करणारा डोळस महात्मा … जोतिराव फुले
मा जयकुमार चर्जन
=============================
अमरावती ;- प्रतिनिधी महात्मा फुले हे जागतिक कीर्तीचे विचारवंत व थोर समाजसेवक होते.ते प्रचंड विद्वान व बुद्धीमान व्यक्तीत्वाचे धनी होते.१९ व्या शतकात जन्माला आलेल्या जोतिराव फुले नामक ज्योतीने शिक्षणाची ज्योत पेटवून या देशातीत लक्षावधी ज्योतींना आपल्या तेजःपूंजाने प्रकाशित केले . ‘तमसो मां ज्योतिर्गमय ‘ या संस्कृत सुभाषितात दडलेला खरा अर्थच मला फुल्यांच्या शैक्षणिक कार्यात सापडला . जोतिराव भारतीय शुद्रांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे ज्ञानसूर्य झाले हाच तो अर्थ सामाजिक समतेची पताका समाजातील अस्पर्शीतांच्या घरोघरी पोहोचविण्याचे प्रचंड मोठे मानवतावादी कार्य केले आहे*.
*कुठल्याही राष्ट्राच्या सामाजिक आरोग्याची गुणवत्ता ही त्या राष्ट्रातील स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीवरून ठरत असते १९ व्या शतकात भारतीय स्त्री ही या समाजाची घटक म्हणून गौण स्थानी होती . ती या राष्ट्राची व समाजाची एक सजग नागरिक म्हणून एकंदरीत सामाजिक अभिसरणामध्ये तिचीही भूमिका तितकीच महत्वाची असावी याबाबी ‘ न स्त्री स्वातत्र्यम्अर्हती ‘ या एकाच मनुवचनाने चक्क नाकारल्या होत्या स्त्री -पुरुष समानतेच्या उभारलेल्या व्यापक चळवळीमुळे धार्मिक दडपडशाहीत हरवलेल्या स्त्री स्वातंत्र्याचे शोधकच त्या काळी जोतिराव फुले ठरले होते . फुल्यांनी स्त्री शिक्षणाचा आरंभ करून समस्त भारतीय स्त्रियांसाठी तिचं स्वतःच क्षितिज विस्तारून तिची अडवणूक करणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक चौकटीच पूर्णतः उध्वस्त केल्यात* .
*मानव समाज जसजसा प्रगत व्हायला लागला तसतसा स्वातंत्र्य शब्दाचा अर्थही व्यापक होत गेला . धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदि संकल्पना हा त्याचाच भाग आहे . परंतु मानवी स्वातंत्र्याची फुलेंनी मांडलेली संकल्पना ही नैसर्गिक होती .ती ‘ प्रत्येक मनुष्य जन्माने समान आहे.’ या विचारांवर आधारित होती .ती वैश्विक असल्याने समस्त मानवी स्वातंत्र्याची वाहक होती* .
*विद्वत्ता आणि बुद्धीमत्ता या दोन्ही बाबी तशा कायम शांत असतात विवेकी माणसांमध्ये हे गुण प्रकर्षाने आढळून येतात फुले चरित्राच्या अभ्यासात हे गुण मला प्रकर्षाने जाणवले. या गुणांमुळेच फुले समाजातील अनाथ, विधवा, अस्पृश्य गणल्या गेलेल्या सर्व हारा घटकां साठी मायेचा आधार बनले होते त्यांचे हे कार्य कोणत्या पुरस्कारासाठी नव्हते, कोणतिही प्रसिद्धी, प्रशंसा, स्तुती किंवा वाहवा मिळविण्यासाठी तर नव्हतेच तर ते होते समाजात बोकाळलेल्या अनिष्ठरुढी, परंपरेच्या समूळ उच्चाटनासाठी . वेगवेगळ्या कारणांमुळे अनाथ झालेले व विस्थापितांचे संगोपन करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला होता त्यांची समाजसेवा ही विनामुल्य व पदरमोड करून सुरु होती* .
*फुल्यांचा लढा हा तत्वांचा, मूल्यांचा व विचारसरणीचा होता .त्यांनी शुद्राति – शुद्रांच्या रोजच्या किळसवाण्या जगण्यातील भयावह वास्तव जवळून पाहिले होते. माणूस असूनही ब्राह्मणी वर्णाने शुद्रांना पशूपेक्षाही हीणकस वागणूक दिलेली त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती. शुद्रांची सावलीही जमिनीवर पडू नये, त्यांचे पदचिन्हे व थुंकीही मातीवर पडू नये यांसाठी त्यांच्या ढुंगणाला फळा व गळ्यात मडके बांधण्याचे अमानवी प्रकार त्यांना अस्वस्थ करत होते . याच सगळ्या सांस्कृतिक गुलामीचे विरुद्ध फुल्यांनी दंड थोपटले . फुल्यांचे आंदोलन व चळवळच मूळात मानवी शोषणाच्या मुक्तीची होती .शिक्षण नसल्याने लिहिता वाचता न येणाऱ्या कोटयवधी भोळ्या भाबड्या लोकांच्या जगण्याच्या प्रकाश वाटा शिक्षणाच्या साहाय्याने प्रशस्त करणारे फुले हे त्याकाळचे एकमेव डोळस महात्मा होते* .
*’ डोळस ‘ याचा शब्दशः अर्थ शाबूत दृष्टीचा असलेला का डोळसाचे धरुनि कर । आंधळा सत्वर चालतसे*!
*नुसते डोळे असणे म्हणजे डोळस नव्हे बघण्याची एकप्रकारची दृष्टी म्हणजे डोळसपण होय* .
*डोळसाला चालताना कुठे थांबायचे याचे नेमके भान आवश्यक असते आणि तेच भान फुल्यांना होते*.
*महात्मा जोतीराव फुले म्हणजे भन्नाट कल्पना असलेला भन्नाट माणूस होते . ते तत्वज्ञ, विचारवंत व क्रांतीकारी समाज सुधारक होते .फुलेंवर पाश्चात्त्य लेखक थॉमस पेनच्या विचारसरणीचा जसा प्रभाव जाणवतो तसाच प्रभाव छत्रपती महाराजांच्या विचारांचाही जाणवतो . एक भारतीय म्हणून फुले जेव्हा पाश्चात्त्य विचारवंतांच्या संपर्कात आले तेव्हा त्यांना आपल्याकडील धर्मातीत विषमता व तिचे हिडीस स्वरुप स्पष्टपणे दिसून आले . भारतात ब्रिटीशांची सत्ता होती .इंग्रजी विद्येचा आरंभ देशभर होऊन ती इथल्या जनमानसात रुजायला लागली होती .सत्ता लालसा सोडली तर इंग्रजांचा सुधारणावाद फुलेंना भावला होता .मनुष्य जन्माने समान आहे, त्यामुळे वर्णभेद -उचनीचपणा हया सर्व पोकळ कल्पना असून त्या मानवनिर्मित आहे यावर फुले ठाम होते* .
*फुले धर्मसुधारणा करत असतांना त्यांना सुधारणावादी अनेक ब्राह्मण मित्र येऊन मिळालेत . विष्णुशास्त्री* *चिपळूणकर ,अण्णासाहेब भिडे, विष्णुपंत थत्ते . त्यातील वाळवेकर , परांजपे हे तर फुले कुटुंबाचे कायम घटक राहिलेत . त्यांची मैत्री ही वेडया दोस्तीतील वैचारिक शहाणीव होती .धर्मग्रंथ वाचले असल्याने धर्माचे अंतरंग व बहिरंग कोणते हे फुल्यांना चांगलेच ज्ञात होते शिवाय फुल्यांनी धर्मकल्पना व त्यातील फोलपणा आपल्या पुरोगामी ब्राह्मण मित्रांकरवी अगदी चांगल्या पध्दतीने समजून घेतल्या होत त्यांच्यातील याच डोळस दृष्टीने विज्ञानाच्या झाडावर निर्भयतेने चढून अज्ञानाच्या सीमा आपल्यातील विचार विवेकाने उल्लंघून धर्मग्रंथ वाचले असल्याने धर्माचे अंतरंग व बहिरंग कोणते हे फुल्यांना चांगलेच ज्ञात होते *समाजिक विकृतांचा सुकाळ हा फुल्यांच्याही काळी होता .या विकृतांनी फुले व सावित्रीमाईंना प्रचंड त्रास दिला . त्यांनी सुरु केलेले शैक्षणिक कार्य या विकृतांच्या पचनी कदापिही पडणारे नव्हते . त्यामुळेच शुद्रांच्या मुला-मुलींना शिकविण्यासाठी जाणाऱ्या सावित्रीमाईंना त्यांनी शारीरिक व मानसिक त्रास देण्याचा सपाटाच चालविला होता . तरीही त्या ऐकत नाही हे पाहून संतापलेल्या याच विकृतांनी त्यांच्या अंगावर शेणगोळे फेकले . त्यांना दगडं मारून जखमी केले . तरीही सावित्रीमाईंनी ज्ञानदानाचा आपला वसा सोडला नाही. या सगळ्या त्रासाला झेलत त्या अधिक खंबीर बनल्या . त्यांच्या पाठीशी जोतिराव फुले सर्व ताकदीने उभे राहिलेत* .
*जयकुमार चर्जन*
अमरावती
मो .९४२०७१३९९८ * ( ‘ डोळस महात्मा ‘ या माझ्या आगामी* पुस्तकातून )*