बौद्ध वधू , वर मेळाव्यास गुजरात , मध्य प्रदेश येथूनही मिळाला प्रतिसाद
…………………………………………………………………
जळगाव :- जळगाव येथील सैनिकी सभागृहात आयोजित बौद्ध वधू वर परिचय मेळाव्यात गुजरात , मध्य प्रदेश याच बरोबर महाराष्ट्रातील मराठवाडा , विदर्भ , मुंबई या भागातील २१७ मुला मुलींनी आपला परिचय करून दिला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक संजय इंगळे होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपण आता सरकारी नोकरीची अपेक्षा सहसा ठेवू नये , लहान लहान उद्योग सुरू केले , खाजगी नौकरी मिळविली तरी आर्थिक प्रगती होत असते , संसारात समाधान सर्वात मोठी बाब आहे , आपण समाधान नाही मानले तर आपला संसार सुखाचा होऊच शकणार नाही .
प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या समाजात आजही काही जुन्या रुढी , परंपरा पाळल्या जातात , बौद्ध धर्माच्या विवाह विधीत आम्ही एक सुत्रता ठेवत नाही , खूप उशीरा लग्न लावणे , लग्नावर अनावश्यक आर्थिक खर्च केला जाणे या सर्व बाबी आजच्या सुशिक्षित पिढीने विचारात घेवून त्या टाळून बुद्ध व बाबसाहेबांना अपेक्षित समाज निर्माण करावा असे आवाहन केले .
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी आज अश्या मेळाव्याची गरज निर्माण झाली आहे, नोकरी , शिक्षण , व्यवसाय या व अन्य कारणांनी माणसं आपल्या गावापासून , नातेवाइकांपासून दूर दूर राहत आहे त्यांना एकत्र आणण्याचे व परस्परांमध्ये आपलेपणा निर्माण करण्याचे काम अश्या मेळाव्या मधून होत असते असे विचार व्यक्त केले .
प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी समाजातील काही प्रश्नांवर मार्मिक टीका करून असे प्रश्न वेळीच मिटवून टाकावे असे सांगितले .
मुख्य संयोजक चंद्रगुप्त सुरवाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की आज आपल्या समाजात मुलींची संख्या इतर समाज्याच्या तुलनेत जास्त आहे तरी सुध्दा मुलांना मुलगी मिळत नाही अशी ओरड सुरू आहे ही ओरड अश्या मेळाव्यातून दूर केली जाईल .
सुरवातीस भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . निमंत्रितांचा सत्कार शाल , बुके देवून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमेध नेतकर , दीपक बनसोडे , बाबुलाल सोनवणे , प्रशांत सोनवणे , चंदा सुरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.