डॉ. योगेश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली परिश्रम शाळेचा गौरवाचा ध्वज उंचावला
सामाजिक न्याय विभागाकडून परिश्रम शाळाला प्रशस्तीपत्र व सत्कार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
दिनांक ४ जुलै २०२५ : नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा, पारोळा यांना सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय “Disha Implementing School 2024-25” म्हणून निवड करून गौरविण्यात आले आहे. ही गौरवशाली निवड सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई, आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे, NIMH सिकंदराबाद आणि जय वकिल फौंडेशन व रिसर्च सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानें केली गेली.
या अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे या विशेष शाळेला हक्काने नाशिक विभागातून एकमेव “Disha Implementing School” म्हणून निवड मिळाली आहे. बौद्धिक अक्षम वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा दिशा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा असून, यात विद्यार्थ्यांना शिक्षणासह जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा यांच्या अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या नेतृत्वाखालील कार्यसंघाचे मानांकन करण्यात आले. कार्यक्रमात श्री. रामकृष्ण शेलकर सर, श्री. कुणाल महाजन सर यांना प्रशस्तीपत्र आणि सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री. मानसिंग पावरा साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास प्राचार्य श्री. दौलतराव तोरवणे साहेब, संस्थापक अध्यक्ष श्री. राधेगोविंद बहुउद्देशीय संस्था, धुळे, तसेच राज्य समन्वयक दिशा अभियान श्री. निलेश चव्हाण, श्री. अमोल कदम, श्री. अभय रोटे यांसह धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील मुख्याध्यापक व विशेष शिक्षक यांची उपस्थिती लाभली.
परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा यांच्या या यशामुळे क्षेत्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संगोपन व शिक्षणासाठी नवीन आदर्श निर्माण झाला असून, समाजात दिव्यांग शिक्षण क्षेत्राची भरभराट होण्यास गतिमान मार्ग उपलब्ध झाला आहे.
या गौरवाने शाळा आणि संबंधित शिक्षकांना सेवा करण्याची नवी प्रेरणा प्राप्त होत आहे. भविष्यातही असेच अधिक अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविण्याची अपेक्षा आहे.