स्मशानभूमीत अघोरी कृत्य करून महिलांच्या फोटोवर काळी जादू, दोन तरुणांना ठोकल्या बेड्या
(ठाण्यातील एका स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर काळी जादू करतानाचा दोन तरूणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.)
ठाणे(मनिलाल शिंपी): ठाण्यातील स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर तरूणांनी काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पिपंळास गावातील स्मशानभूमीत घडली आहे. विशेष म्हणजे काळी जादू करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात पिंपळास गावचे पोलीस पाटील अशोक उमाकांत जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली असून त्यांना अटक केली आहे. कबीर दिलीप चौधरी (29) आणि निखिल संतोष पाटील (23) अशी अटक केलेल्या तरुणांची नावं आहेत.
महिलांचा जीवाला धोका व्हावा उद्देशानं काळी जादू : कबीर आणि निखिल यांनी संगनमतानं 29 जून ते 4 जुलैच्या मध्यरात्री दोन अनोळखी महिलांच्या फोटोवर गावातील समशानभूमीत अघोरी कृत्य करत होते. खळबळजनक बाब म्हणजे दोन अनोळखी महिलांच्या जीवाला धोका व्हावा, या उद्देशानं काळी जादू करून त्यांचे फोटो पिंपळास गावातील स्मशानभुमीमध्ये ठेवला होता. दरम्यान हा धक्कादायक प्रकार काही गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळं हा प्रकार उघड झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी : “या प्रकाराबाबत गावचे पोलीस पाटील अशोक जाधव यांनी सर्व प्रकाराची चौकशी करून कोनगाव पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात शनिवारी 5 जुलैला रोजी तक्रार दाखल केली. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत दोन्ही तरुणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली,” असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के यांनी सांगितलं. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन गायकवाड करत आहेत.