• Thu. Jul 10th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

वैज्ञानिक दृष्टिकोन व नैतिक संस्कार घडवतो तो गुरू !!!!

Jul 10, 2025

Loading

वैज्ञानिक दृष्टिकोन व नैतिक संस्कार घडवतो तो गुरू !!!!

भारतीय संस्कृती दैदिप्यमान संस्कृती आहे. भारतामध्ये जगाला ज्ञान देणारे अनेक विद्यापीठे होऊन गेले. सर्वात जास्त विद्यापीठे बुद्धांच्या विचारावर उभी होती. भारतामध्ये जगाला ज्ञान देईल असे अत्यंत प्रभावी तत्त्वज्ञान होते. या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी विदेशातून अनेक लोक आले. मानवाला मानवतेच्या पायावर उभी करणारी येथील संस्कृती आहे. भारतामध्ये अनेक महापुरुषांनी आपले जीवन समर्पित करून देशाला उन्नत केले. त्यामध्ये लोकायत, आजीवक, चार्वाक , गौतम बुद्ध, चक्रधर स्वामी, बसवेश्वर, महावीर, अनेक संत, ऋषी यांनी या देशात योगदान दिलेले आहे. प्राचीन काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेला नव्हता तेव्हा माणसाला अंतिम आनंद मिळण्यासाठी मोक्ष ही कल्पना रुजवण्यात आली. परंतु गौतम बुद्धाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगाला विवेकाच्या मार्गाने जाणे भाग पडले. भारतामध्ये सर्वात मोठे ग्रंथ रामायण व महाभारत मानले जातात. या ग्रंथाची रचना करणारे महर्षी व्यास व वाल्मिकी यांनी उत्कृष्टपणे साहित्याची निर्मिती केली. महर्षी व्यास यांना उत्कृष्ट साहित्य लिहिल्यामुळे त्याचप्रमाणे प्राचीन ग्रंथ लिहिल्यामुळे त्यांना गुरु ही उपाधी देण्यात आली. वाल्मीक ऋषींनी रामायणाची अप्रतिम रचना केली त्यामुळे त्यांचेही महत्व वाढले. त्या काळामध्ये श्रीकृष्णाने बहुजनाचा विचार करून इंद्रासारख्या अहमी राजाचे बहुजनाच्या सहकार्याने गर्वहरण केले. या जुन्या ग्रंथांमध्ये शंबूक व कर्ण यांच्यावर अस्पृश्य समाजात जन्मल्यामुळे अन्याय झालेला दाखवलेला आहे. विधुर सारखा विद्वान व्यक्ती दृष्टीक्षेपात पडतो. श्रीकृष्णाने केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना जगद्गुरु बिरुदावली लावण्यात आली. महर्षी व्यास हे आपल्या खानदेशातील लेखक असल्याचे मानले जाते. कोळी समूहातून आलेले मोठे प्राचीन काळातील लेखक होते. त्यांच्या अफाट लेखनामुळे त्यांची जयंती ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. व्यासांच्या विद्वत्तेवरून त्यांची जयंतीगुरू पौर्णिमा म्हणून साजरी होते. गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या पाच शिष्यांना सर्वप्रथम विद्यादान केले त्यानिमित्त बुद्धधम्मा गुरुपौर्णिमा साजरी होते. जैन धर्मामध्ये महावीरांनी दिलेल्या ज्ञानाची कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. इतर धर्मांमध्ये गुरुपौर्णिमा त्यांच्या गुरूंच्या जयंतीनिमित्त साजरी करण्यात येते. भारतामध्ये ज्ञान देणाऱ्यांची अखंड परंपरा होती. त्या परंपरेमुळे जगाला भारतामधील विविध संप्रदायाच्या विचार समजला. बुद्धाने या सर्व विचाराच्या पुढे जाऊन नवीन दृष्टिकोन जगाला दिला. त्या दृष्टिकोनामध्ये वैज्ञानिकता, मानवता, विवेक, निती मूल्ये होती. गुरु म्हणजे ज्ञानाचा महासागर होय. गुरुमुळे माणसाची पुढील वाट सुकर होते. संत कबीरांनी गुरु बद्दल सांगितले आहे की “गुरुबिन कोण दिखाइए बाट l बहुत बडा यमघाट ”
प्राचीन काळात गुरूंच्या गुरूला आचार्य ही पदवी होती.गुरू हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. प्राचीन काळामध्ये मौखिक परंपरेला प्राधान्य होते. त्यामुळे त्या काळातील आचार्य, गुरु, संत, ऋषी यांनी तत्त्वज्ञान मुखोद्गत करून ठेवलेले होते. अनेक ऋचा, श्लोक, वचने त्यांची पाठांतरीत होती. गौतम बुद्धाने मानवाला सांगितले की आपणच आपले गुरु आहात. प्रत्येक मानवाला सतसद विवेकबुद्धी असते. त्याने त्या बुद्धीचा विकास करावा. गौतम बुद्धांनी त्या काळात निर्माण झालेल्या भोंदूगिरीला वचक बसविला. जटा, दाढी वाढवून कुणी गुरु होत नाही हे सिद्ध केले. बरेच लोक साधूपणाचा आव आणून विविध संप्रदाय तयार करून मायापुंजी जमा करीत असतात. अशा सांप्रदायांमध्ये मानवाचा कोणताच विकास होत नाही. चमत्कारावर आधारित यांचे तत्त्वज्ञान असते. स्वतःला सिद्ध पुरुष समजून ते वावरत असतात. संत नामदेवांनी स्थापन केलेला भागवत संप्रदाय हा वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला संप्रदाय होता. यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक होते. आजही पंढरपूर येथे पांडुरंगाच्या भेटीला सर्व जाती-धर्मातील लोक पंढरपूरला येतात. त्यांच्यामध्ये कोणताही अहंभाव नाही. पंढरपूर देवस्थान इतर देवस्थानाप्रमाणे दक्षिणा घेतली जात नाही. सामान्य दीनदुबळ्याचा हा देव आहे. वारी ही वारकऱ्यांच्या प्रबोधन होण्याच्या दृष्टिकोनातून आयोजिलेली ज्ञान परंपरा आहे. सर्व भागातील लोक आपल्या भागवत धर्माची पताका सर्वत्र पोहोचविण्यासाठी एकत्रित झालेला जनसमूह म्हणजे वारी होय. या वारीमध्ये विविध संतांचा वाल तर यांना उपदेश केला जात असे. वारकऱ्यांसाठी विविध विचाराचा हा ज्ञानयज्ञ होता. संत नामदेवांनी मनुवाद्यांविरुद्ध सुरू केलेला विद्रोह होता. देव हा सर्वांचा आहे मग त्यामध्ये त्याला पूजनासाठी विशिष्ट जात का असावी? समानतेसाठी केलेला हा विद्रोह होता. संत नामदेव व इतर संतांनी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर समतेची विचारधारा पोहोचवली. जो अन्यायावर वार करतो तो वारकरी होय. संत तुकाराम यांनी महाराष्ट्रभर खऱ्या ज्ञानाचा प्रचार केला. “ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू ” असे अभंगात स्पष्ट सांगून भोंदू साधूंची वाट लावलेली आहे. गुरु हा शब्द दोन अक्षरांनी बनलेला आहे. त्यातील गु -म्हणजे अंदाज होय.रू -म्हणजे दूर करणे. जो व्यक्ती आपल्या जीवनातील व शिष्याच्या जीवनातील अंधकार दूर करतो त्याला गुरु म्हणतात.आज अध्यात्मिक क्षेत्रात भोंदूगिरी दिसत आहे. सामान्य जनतेला लुटणारे नकली साधू जागोजागी निर्माण झालेले आहे. जागोजागी यांचे पैसे कमवणारे मठ उभे राहिलेले आहे. यांच्या मठातून विविध साहित्य विकले जाते. जगाला सत्य सांगण्याऐवजी काल्पनिक गोष्टी सांगून लोकांना लुबाडले जाते. खऱ्या गुरूला लोक ओळखत नाही. खोट्या गुरूंच्या मागे जात असतात. संत तुकाराम महाराजांनी आपले विचार जगाला विनामूल्य दिले. त्यांच्याच अभंगावर किर्तन करणारे लोक अमाप पैसा घेऊन चमत्कारिक गोष्टी सांगून लोकांना लुबाडतात. गुरु असले पाहिजे तर संत तुकारामासारखे स्वतःच्या नावावर कोणतीही संपत्ती त्यांच्याकडे नव्हती. असलेली सर्व संपत्ती त्यांनी लोकांना दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु म्हणून संत तुकारामांना मानले जाते. शिक्षण क्षेत्रामध्ये नैतिकदृष्ट्या मार्गदर्शन करणारे बोटावर मोजण्या इतपत सापडतात. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य , ज्योतिष यावर भूलथापा देणारे असंख्य वाढलेले आहेत. अशा युगात सत्यावर चालणाऱ्या गुरूची गरज आहे. जागोजागी महाप्रसादाचे पेव फुटले आहे. परंतु आपल्या गावातीलच गरीब दिन दुबळा भुकेला या लोकांना दिसत नाही. पंढरपूरचा देव ज्याला फुल, पैसा, नैवेद्य याची काही गरज नाही. सर्वसामान्यांचा आदर्श असा गुण घेण्यासारखा देव संतांनी उभा केला. आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने खऱ्या गुरुचा शोध व चांगला शिष्य होण्याचा हा दिवस आहे.

पत्रकार
एस.एच.भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *