
धरणगाव शहरातील धरणी नाला रस्ता व आठवडे बाजार परिसर अतिक्रमण मुक्त* सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढावे : मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचे आवाहन !…
*धरणगाव शहरातील धरणी नाला रस्ता व आठवडे बाजार परिसर अतिक्रमण मुक्त*
सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढावे : मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचे आवाहन !…
प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव – नगरपरिषदेने शासनाच्या अभय योजनेचा लाभ सर्व मालमत्ताकर थकबाकीदारांना मिळण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संपूर्ण शहरात गेल्या आठवडाभर विविध ठिकाणी समाधान शिबीर राबविले. यामध्ये शहरातील नागरिकांच्या स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, व रस्ते गटार बांधकाम विषयक विविध समस्या, तक्रारी जाणून घेण्यात आल्या. स्वच्छता विषयक अनेक तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
पाणीपुरवठा व पथदिवे संदर्भातील तक्रारींबाबत संबंधित कंत्राटदारास निर्देश देण्यात आले असून सदर तक्रारींचे देखील लवकरच निराकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर रस्ते व गटार बांधकाम विषयक मोठ्या तक्रारींची नोंद घेण्यात आली असून भविष्यात याबाबत नगर परिषदेमार्फत कार्यवाही नक्कीच करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे.
समाधान शिबीर व अभय योजनेच्या अनुषंगाने शहरात फिरत असताना अनेक ठिकाणी रहिवासी व व्यापारी भागात देखील अनेकांनी गटारींवर अतिक्रमण केल्याचे व गटारीच्या पुढे देखील बांधकाम केल्याचे देखील निदर्शनास आले आहे. तसेच अनेक नागरिकांनी आपल्या पाण्याच्या टाक्या रस्त्यावर ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अनेक रस्ते व गल्लीबोळ अरुंद झाले असून या ठिकाणी चारचाकी गाडी तर सोडा साधी दुचाकी देखील घेऊन जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक गल्ल्यांमध्ये व भागात घंटागाडी घेऊन जाणे दुरापास्त झाले आहे. भविष्यात काही दुर्घटना घडली तर अशावेळी मोठ्या गाड्या, अग्निशमन गाडी या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही. तसेच गटारीवर केलेल्या अतिक्रमणामुळे या गटारी स्वच्छ करणे कठीण झाले आहे. त्यामुळे याबाबतच्या तक्रारींमध्ये देखील वाढ झाली आहे.
यामुळे गटारींवरील अतिक्रमण व रस्त्यावर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या काढून घेणे बाबत नागरिकांना नगरपरिषदेमार्फत आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शहरातील अनेक नागरिक आपले अतिक्रमण व पाण्याच्या टाक्या स्वतःहून काढून येत आहेत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे धरणीनाला रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना केवळ आवाहन करताच या नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले आहे.
यामुळे या ठिकाणी होणारा नवीन रस्ता प्रशस्त होण्यास मदत झाली आहे. याचप्रमाणे आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी आठवडे बाजार मैदानावरील अतिक्रमण देखील नागरिक व्यापाऱ्यांना केवळ आवाहन करताच त्यांनी स्वतःहून हटविले आहे. अशाप्रकारे जागरूक धरणगावकरांनी आपले रस्ते, गटारीवरील अतिक्रमण, रस्त्यावरील पाण्याच्या टाक्या जर स्वतःहून काढून घेतल्या तर सर्व रस्ते प्रशस्त होऊन गटारींची स्वच्छता करण्यास मदत होईल. तसेच धरणगावकरांचे जीवनमान अधिक चांगले होईल व भविष्यातील पिढ्यांना चांगला वारसा मिळेल. तरी सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढावे असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले आहे.