
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित* *”हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित*
*”हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”*
जेजुरी, पुरंदर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे राजे भूषणसिंह होळकर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी राजे भूषणसिंह होळकर महाराज म्हणाले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाजातील वंचित घटकांसाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य स्तुत्य आहे. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे की राजकीय मतभेद असले तरी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी सर्वजण उभे राहतात. ताईंनी अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श जपत महिलांना न्याय व शिक्षणाची दिशा दिली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण झाले पाहिजे. पुरस्कार सोहळ्यात केवळ बुके न देता, विचारांचे पोषण करणारी पुस्तके भेट दिली पाहिजेत. म्हणूनच मी ताईंना महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर आधारित ‘महाराजा-ए-हिंद’ हे इतिहास असलेले विशेष पुस्तक प्रदान केले.”
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, तर समाजातील त्या सर्व महिलांसाठी आहे ज्या आपल्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी लढत आहेत. जेजुरी परिसरातील मुरळी प्रथेच्या निर्मूलनासाठी सातत्याने काम करून जवळपास २०० महिलांना व मुलींना या प्रथेतून मुक्त केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजपरिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे, हेच अहिल्यादेवी होळकर यांना खरी आदरांजली ठरेल.”
त्या पुढे म्हणाल्या, “राजकारणात विचारभेद असले तरी चांगल्या कामांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आमदार निधीतून जेजुरी व इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासास हातभार लावला आहे. स्त्री सक्षमीकरण आणि समाजकल्याणाचे काम हीच माझी खरी ध्येयपूर्ती आहे.”
*सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती*
या सोहळ्यास मा. ममता लांडे-शिवतारे (आमदार प्रतिनिधी), मा. दिलीपदादा बारभाई (माजी नगराध्यक्ष, जेजुरी), मा. दिलीपआबा यादव (माजी जि.प. सदस्य), मा. सचिन पशवे (अध्यक्ष भाजप, पुरंदर), मा. विठ्ठल सोनवणे (अध्यक्ष शिवसेना, जेजुरी), मा. शांताराम पोमण (सचिव आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान), डॉ. धनाजी नागणे (प्राचार्य शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी) आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या सुदर्शन त्रिगुणाईत, रंजना कुलकर्णी, स्वाती टकले, शालिनी सुर्वे, वैशाली काडे, हेमा घुले तसेच स्त्री आधार केंद्राच्या लता सोनवणे यांसह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.