रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला
1 min read

रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला

Loading

रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला

मुंबई (विशेष प्रतिनिधी – उदय नरे)

महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ आणि छात्र भारती यांच्या संयुक्त विद्यमाने रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच मुंबईत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात रात्र शाळांमधील गरीब, वंचित आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर मुख्याध्यापक संघाच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री. चंद्रकांत म्हात्रे आणि श्री. रोहित ढाले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रवी कांबळे यांनी केले.

रात्र शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹५०० ची रोख रक्कम व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. हे विद्यार्थी दिवसभर नोकरी-धंदा करून रात्री शिक्षण घेतात. महिला विद्यार्थिनी दिवसभरात चार-पाच घरे सांभाळून, घरगुती कामे करूनही शिकण्यासाठी शाळेत येतात. त्यांच्या शिक्षणाची तळमळ आणि जिद्द ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे अनेक रात्र शाळांमध्ये एकाच वर्गात आई-मुलगा, पती-पत्नी असे विद्यार्थीही एकत्र शिकताना दिसतात.

मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष यांनी सांगितले की, रात्र शाळांचे संपूर्ण शिक्षण मोफत असावे, तसेच सायंकाळी भोजनाची सोय सरकारने करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने सांगितले की, “माझे शिक्षण अर्धवट राहिले होते. आता रात्र शाळेतून पुन्हा शिकण्याची संधी मिळते आहे. आपण ज्या घरात शिक्षणाविना कोणी असेल, त्यांना समजावून शाळेत आणणे हे आपले कर्तव्य आहे.”

या कार्यक्रमास प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. आमदार कपिल पाटील यांनी रात्र शाळांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांची संख्या १०० च्या पुढे गेलेल्या शाळांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी रात्र शाळांशी संबंधित समस्या सोडविण्यासही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

शिक्षक भारतीचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक संघाचे सल्लागार आदरणीय अशोक बेलसरे सर यांनी शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करत, गुणवंत शिक्षकांच्या सन्मानार्थ स्वतंत्र संमेलन घेण्याची सूचना मांडली.

छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी रात्र शाळेतील अडचणींवर मात करून शिक्षण सुरू ठेवण्याचे आवाहन केले. राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांदळकर यांनी रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनंदा कदम आणि रोहित ढाले यांनी संयमी पद्धतीने केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ व छात्र भारती संघटना यांनी संयुक्तपणे केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत म्हात्रे, शिवाजी खैरमोडे, राधिका महांकाळ, नरेंद्र वाघमारे, अजित वाघमारे, समाधान पाटील, भडके सर, अमोल गंगावणे, अनंत सोलकर यांचे विशेष योगदान लाभले.

शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ‘मॉर्निंग वॉकिंग’चे सुभाषभाई, सुमनभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मोफत वाटण्यात आले. मुख्याध्यापक संघातर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *