



आशिया खंडातील विस्ताराने द्वितीय क्रमांकावर असलेल्या पेमगिरी वटवृक्षाच्या छायेत आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे पर्यावरण व पर्यटन अधिवेशन संपन्न
(३० मार्च २०२३)
सविस्तर वृत्त –
ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या व नैसर्गिक वारसा लाभलेल्या स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीत आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचा पर्यावरण व पर्यटन विषयक जनजागृती पर्यावरण अधिवेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्याच बरोबर रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सवाचाही कार्यक्रम टाळ, मृदूंग,भजनाच्या साथीने हरिनामाच्या गजरात पार पडला.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व भारताबाहेरील इतर देशातही पर्यावरण समतोल राखण्यासाठी व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी महत्वपूर्ण काम करत आहे. पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संघटनांचे पर्यावरणीय कार्यक्रम हे पर्यावरण च्या सानिध्यातच व्हावेत या हेतू
ने या संस्थेचा या वर्षीचा हा पर्यावरण व पर्यटन अधिवेशन सोहळा महाराष्ट्र राज्यातील आकाराने सर्वात मोठे असलेल्या पेमगिरीतील विशाल महावटवृक्षाच्या सानिध्यात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या पर्यावरण अधिवेशन कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा तसेच पर्यावरण विषयक विविध स्पर्धेत सहभागी व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या नंतर सर्वांनी या महावटवृक्षाच्या सानिध्यात ग्रामीण भागातील प्रसिद्ध भोजन असलेलं पिठलं भाकरीचाही आस्वाद घेतला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील विशेष पर्यावरण संरक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी देशाच्या बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत सरकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त माननीय राहीबाई पोपरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.देवा तांबे, टेक्सास,अमेरिका येथून उपस्थित राहिलेल्या आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ.सुहासिनी भामरे, संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला सक्षमीकरण अध्यक्षा,मानवाधिकार न्यायिक महासंघाच्या डॉ.रागिणी चवरे, संगमनेर तालुका वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे साहेब तसेच संघटनेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हे पदाधिकारी, तालुके पदाधिकारी तसेच परिसरातील पर्यावरण प्रेमी, पर्यटन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे, उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी उपस्थितांना पर्यावरण व सामाजिक कार्य यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. या ठिकाणी या महाकाय वटवृक्षाच्या छायेत सामूहिक वनभोजन चे नियोजन करण्यात आले. या पर्यावरण अधिवेशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाल्मिक कोल्हे व सूत्रसंचालन प्रा.सोमनाथ नाडे यांनी केले.