जनतेला स्वातंत्र्याची अनुभूती देणारा हितेषी राजा शिवबा ..
आपल्या ह्या विविधतेने नटलेल्या भूमीत राजे शिवबा सारखा राजा झाला याचा सर्वांना अभिमान आहे. राजा कसा असावा याचे जगाला दिलेले उत्तम उदाहरण म्हणजे राजा शिवबा!!शूरवीर ,बलाढ्य सरदार शहाजीराजे व माता जिजाऊ यांच्या पोटी जन्माला आलेले जगाला आदर्श ठरावे असे नाव म्हणजे छत्रपती राजे शिवराय होय. वेरूळचे भोसले घराणे हे संस्काराची खाण असलेले घराणे होते. अशा घराण्यात सर्व जाती-जमातींना आपुलकीची वागणूक दिली जात होती .19 फेब्रुवारी सोळाशे वीस मध्ये शिवबाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला .त्यावेळी आपल्या प्रांतात अनेक राज्य करणाऱ्या सत्ता होत्या. वेगवेगळ्या भागात त्यांची सत्ता होती .सर्व प्रांत गुलामगिरीने माखलेला होता. अशावेळी राजे शहाजी यांच्या मनात आपल्या प्रजेला सुखी व संपन्न बनवण्याची कल्पना आली .त्यांची ही कल्पना प्रत्यक्ष साकार करण्याची जिद्द माता जिजाऊने ठेवली. आपल्या शिवबाला सर्व प्रकारचे शिक्षण देऊन ती योजना साकार करण्याचे, शिवबा मध्ये मनोबल वाढविणे अनेक संस्कारांनी शिवबाला घडवणारी माता जिजाऊ संस्काराची जननी होती .चारी बाजूंनी बलाढ्य राज्यांशी सामना करण्यासाठी सर्वोत्तम सर्व गुणसंपन्न ,सामर्थ्यशाली, धैर्यवान ,निडर असा राजा माता जीजाऊने घडविला. मानवतेचा ,समतेचा ,बंधूतेचा पाया शिवबां ने या भूमीत रचला .आजपर्यंत लोकांना हुकुम गाजवणारा, गुलामी लादणारा राजा माहीत होता. परंतु रयतेचा राजा शिवबा होता .सर्व जाती-धर्मातून उत्तमोत्तम मावळा एकत्र करण्याचे काम शिवबांनी केले .आपल्या शरीरात सर्व प्रकारचे कौशल्य असलेल्या सवंगड्यांची नेमणूक राजा शिवबाने सरदार म्हणून केली होती. त्यावेळी धर्माधर्मात तेड नव्हती.सुफी संतांच्या जागरणाने सर्वधर्म समभाव याची पेरणी झाली होती. संतांनी समतेची मांडणी केलेली होती .भोसले घराण्याचे कुलदैवत तुळजापूरची भवानी माता होती. महादेवावर भोसले घराण्याची श्रद्धा होती. ती श्रद्धा शिवबाने कायम ठेवली. ते सर्व धर्म समभाव मानणारे राजे होते. त्यांच्या सैन्यात सर्व जातीतील धर्मातील लोक होते. शिवबाने तेराव्या वर्षी पहिले युद्ध केले होते. युद्धाच्या सर्वच कला शिवबाला येत होत्या .ज्याप्रमाणे माशाला पाण्यात पोहण्याचे शिकवावे लागत नाही त्याप्रमाणे शिवबाने सर्व प्रकारचे ज्ञान जाणून घेतले होते .माता जिजाऊ हीच सर्वगुणसंपन्न असल्याने शिवबात मानवतेची गुढी उभारली गेली .राजे शहाजी यांच्या कणखर ,मुत्सद्दी ,निडरपणामुळे शिवबात गनिमी कावा या युद्धशैलीची रुजवन झाली. राजे छत्रपती शिवबाने आपल्या काटेकोर नियमापुढे कोणाचीही गय केली नाही .शेतकऱ्याच्या पिकाला हात लावणाऱ्या म्हणजेच नुकसान करणाऱ्या लोकांना शिक्षा केली. कुणीही कायद्यासमोर श्रेष्ठ नाही व कनिष्ठ नाही. सर्वांना कायदा समान असला पाहिजे .त्यासाठी सर्वांना समान न्याय याप्रमाणे राज्य चालविले .राज्यात साम्राज्य वाढविण्यासाठी राजे शहाजी व जिजाऊच्या ध्येयधोरणानुसार सहा राण्यांशी विवाह झाला.परंतु हे विवाह साम्राज्य वाढवण्यासाठी तसेच राज्य एक संघ ठेवण्यासाठी केले. राजे शिवबा यांनी सर्व राण्यांना समान वागणूक दिली. इतर राजाप्रमाणे स्त्रियांना रखेल म्हणून ठेवले नाही .असा संस्कारांना जपणारा राजा शिवबा होता. शिवबा हा चाणाक्ष राजा होता .भविष्यातील संकटे जाणून होता .त्यासाठी त्यांच्याकडे गुप्तहेर हे खाते अगदी तरबेज होते. बहिर्जी नाईक हे अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व त्यांच्याकडे गुप्तहेर प्रमुख म्हणून होते. जीवाला जीव देणारे मावळे ही राजाची संपत्ती होती. राजाने सरदारांना नेहमी पगारावर नेमणूक केलेले होते .त्यामुळे शत्रूंच्या राज्यातील लूट ही कोणाचेही सामान्य माणसाचे नुकसान न होता केवळ शत्रूचे द्रव्य घेतले जात असे. त्या धनाचा उपयोग आपली सत्ता बळकट करण्यासाठी केला जात होता .शिवबा उत्तम वडील होते .त्यांनी राजे शंभू लहान असताना सईबाईचे निधन झाले होते .त्यावेळी शंभूला सांभाळले. सोयराबाई ह्या सावत्र आईने त्याला परके लेखले नाही.राजे शिवाजी राजांनी शंभूला संस्कृत भाषा शिकवून संस्कृत प्रविण बनवले. त्यामुळेच शंभुने अकराव्या वर्षात असताना बुधभूषण हा संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला. राजे शंभूला सर्व प्रकारचे शिक्षण लहानपणीच मिळाले. त्याला आईची कमी भासू दिली नाही .राजे छत्रपती हे ब्राह्मण गोप्रतिपालक असल्याचे काही बखरकार लिहितात .परंतु शिवबा हे सर्व जातीवर समान प्रेम करणारे होते .केवळ ब्राह्मण लोकांवर त्यांनी प्रेम केले नाही .तसेच ते गोपालक सुद्धा नव्हते. त्यांच्या तबेल्यात घोडे पाळले जात असत. त्यांच्या कडे गाई असल्याचे पुरावे मिळत नाही. त्यांचे हिंदवी स्वराज्य हे केवळ हिंदूंचे स्वराज्य नव्हते .त्यांच्या राज्यात हिंदू, मुस्लिम ,शिख ,ईसाई, पारसी ख्रिश्चन या धर्माचे लोक होते. त्यामुळे ते सर्वांचे राजे होते. त्यांच्या ग्रंथांमध्ये हिंदूं चे राजे असा कुठलाही उल्लेख नाही. त्यांनी मुस्लिम लोकांना मस्जिद बांधण्यात मदत केली आहे. हिंदूंच्या मानवतावादी संतांना सहकार्य केले आहे. ख्रिश्चन फारसी लोक यांच्याकडून सहकार्य मिळविले आहे. पोर्तुगीजांकडून उत्तम पद्धतीच्या तलवारी मिळविल्या आहेत ज्या तलवारीला दोन्ही बाजूने पाते आहेत. राजाच्या हातात पोर्तुगीजांच्या बनावटीची तलवार होती. तिला दुधारी तलवार म्हणतात. त्या काळात हिंदू-मुस्लिम वाद नव्हता. हिंदू सरदार मोगलांकडे, अदिलशहा, निजामाकडे होते. त्यामुळे महाराजांच्या सैन्यामध्ये बरेच मुस्लिम लोक सरदार होते. त्यांनी राजाप्रति आपली निष्ठा कायम ठेवली. कधीही दगा दिला नाही .उलट स्वजातीय लोकांनी दगा दिला .तसेच जवळ राहणाऱ्या लोकांनी संभाजी राजाला पकडून देण्यात मदत केली.यात आपल्या राज्यातील लोक होते .राजाने कधीही अंधश्रद्धा पाळल्या नाहीत. छत्रपती शिवाजी राजे हे विवेकी होते. त्यांनी कधीही मुहूर्त पाहून युद्ध केले नाही. नेहमी अंधाऱ्या रात्रीला युद्धाची योजना आखली. अमावस्या या रात्रीचा फायदा घेऊन युद्ध केले. राजे छत्रपती शिवाजी हे युद्धकलेत निष्णात होते .राजे कुळवाडी भूषण होते. आपल्या राज्यातील जमिनीसाठी त्यांनी विविध ठिकाणी पाण्याच्या योजना केल्या तयार होत्या .गडावर पाण्यासाठी सुविधा केल्या होत्या .युद्धाच्या कठीण प्रसंगी ते माघारी फिरले नाही. त्यांनी नियोजनबद्ध नीती आखून युद्ध केले. आपल्या चलाखीने शत्रूंना नामोहरम केले .स्वतःच्या जीवाची थोडीही चिंता केली नाही .दुसऱ्या धर्माचा आदर करणारा राजा शिवबा होता. शत्रूला पराजित केल्यावर तो शत्रू वेगळ्या धर्माचा असल्यास त्याच्या धर्माच्या ग्रंथाचे एखादे पान सापडले तरी सन्मानाने परत करण्याचा आदेश राजा शिवबाचे होते .राजा शिवबाने आपल्या सावत्र भावास म्हणजे व्यंकोजी यास कधीही वेगळी वागणूक दिली नाही .राजा शिवबा एक आदर्श राजा होता. आतापर्यंत आलेले राजे प्रजेच्या हिताचा विचार करीत नव्हते .शिवबा एक संस्कारी राजा होता .त्यामुळे त्याने रयतेला स्वातंत्र्याने जगायची मुभा दिली .असा राजा होणार नाही .औरंगजेब सुद्धा राजे शिवबा जेव्हा जग सोडून जातात तेव्हा त्याला सुद्धा दुःख होते. अशा राजाची जयंती महान समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावर समाधी शोधून राजे शिवबावर पोवाडा रचून साजरी केली. महात्मा फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली. महात्मा फुलेंनी राजाची महती विविध इतिहासकारांच्या पुस्तकातून वाचली होती. शिवाजी राजे हे न्यायप्रिय राजे होते. त्यांनी राज्यातील अनेक प्रश्न न्यायाने सोडविले. संत तुकाराम यांच्या प्रबोधनाने राजावर सकारात्मक परिणाम झाला. संत तुकारामांच्या उपदेशाने जनतेमध्ये चिकित्सक पद्धतीने बदल होत आहेत त्यामुळे संत तुकारामांच्या विचारांना त्यांनी स्वीकारले. काही बखरकारांनी राजे शिवबा व राजे संभाजी यांचा इतिहास पूर्वग्रह दूषित पणाने लिहिला .त्यांनी जनतेच्या गळ्यातील ताईत असलेल्या ह्या राजाला पाहिजे तो न्याय दिला नाही. बरेच संदर्भ चुकीचे दाखवून राजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला .राजा शिवबाचा मानवतावादी दृष्टिकोन समोर येऊ दिला नाही .वा. सी .बेंद्रे यांच्या संशोधनात्मक लेखनामुळे खरा इतिहास बाहेर आला. इंग्रज इतिहासकार यांनी राजे शिवबाला न्याय दिला. आता बऱ्याच प्रमाणात शिवबाच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख जगाला झाली .आज आम्ही या महापुरुषाच्या विचाराची देवाणघेवाण केली पाहिजे. केवळ जयंती साजरी करून काहीही उपयोग नाही. राजाने दिलेला संस्काराचा ठेवा आम्ही जपला पाहिजे. राजांनी कधीही जात धर्म पाहिला नाही त्या राजाच्या नावाने वाद वाढविले जातात. सर्व समान आहेत कोणीही परका नाही कोणी उच्च नीच नाही या विचाराने जगले पाहिजे. राजे शिवबा व्यसनी नव्हते त्यामुळेच त्यांना चांगल्या प्रकारे राज्य चालविता आले. त्यांचे कुणी जिवलग लोक व्यसनी नव्हते त्यामुळे सत्ता टिकविता आली .आज आम्ही राजे शिवबा आमच्या महाराजांची जयंती साजरी करताना त्यांच्या मूल्यांची आठवण केली पाहिजे .राजाला समजून घेणे यातच राजाची जयंती साजरी करणे होय.
पत्रकार
एस.एच. भवरे
9284695140
