अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थी गटात कै.अच्युतराव अत्रे इंग्लिश मेडियम स्कूल प्रथम आणि महिला गटात पल्लवी कुलकर्णी प्रथम क्रमांकाचे मानकरी
व.वा.जिल्हा वाचनालय जळगाव आयोजित आणि आजीवन अध्ययन विस्तार विभाग, कवयित्री बहिणीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्रायोजित वाचन संस्कृती संवर्धन उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह अभिवाचन स्पर्धा व महिलांसाठी साहित्य अभिवाचन स्पर्धा शनिवार दि.०३.०८.२४ रोजी वाचनालयाच्या सभागृहात उदंड प्रतिसादात संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन कवयित्री बहिणीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक प्रा.डॉ.आशुतोष पाटील यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे कार्याध्यक्ष तथा लेखक अनिलकुमार शाह ( सी.ए.) होते.
‘वाचनालयाच्या चिटणीस प्रा. शुभदा कुलकर्णी यांनी प्रा.डॉ. आशुतोष पाटील यांचा गुलाबपुष्प व ग्रंथभेट देऊन स्वागत केले. स्पर्धेचे परीक्षक सुबोध सराफ, प्रिया सफळे, मंजुषा भिडे,वैशाली पाटील यांचा सत्कार अनुक्रमे शिल्पा बेंडाळे, कार्याध्यक्ष अनिलकुमार शाह, शुभदा कुलकर्णी,अपर्णा भट यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक महिला बालविभाग समिती प्रमुख प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी केले.अभिवाचन स्पर्धेच्या अनुषंगाने आपले उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना प्रा.डॉ.आशुतोष पाटील यांनी आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा उपयोग करतांना काय चांगले काय वाईट हे प्रत्येकाने ठरवून चांगले तेच घेतले पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले ऐकले पाहिजे, चांगले बोलले पाहिजे, चांगले वाचले पाहिजे व चांगले लिहिले पाहिजे.शिक्षण घेतल्यानंतर माणूस म्हणून जगण्याचे प्रश्न असतात त्यासाठी वैचारिक व भावनिक विकासाचे भरणपोषण होणेसाठी सुसंवाद झाला पाहिजे. त्याकरिता भाषा हे माध्यम महत्त्वाचे आहे.भाषेच्या माध्यमातून सुसंवादामुळे माणसाच्या भावनिक वैचारिक विकासा बरोबर व्यक्तिमत्व विकासही होतो त्यासाठी अशा स्पर्धांच्या आयोजनाची आज गरज आहे व त्यातूनच कलागुणी विद्यार्थी घडतात असे मत त्यांनी व्यक्त केले.विद्यार्थी समूह अभिवाचन स्पर्धेस शालेय गटात ३० संघाच्या १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग तर महिला अभिवाचन स्पर्धेत ५१ महिलांनी सहभाग नोंदवला. सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० पर्यंत चाललेल्या या स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ सायंकाळी ५.०० वाजता चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध
स्रीरोग तज्ञ डॉ.मुकुंद करंबेळकर यांचे शुभहस्ते वाचनालय कार्याध्यक्ष सीए अनिलकुमार शाह यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
*विद्यार्थी समूह अभिवाचन स्पर्धा पुरस्कारार्थी*:-
प्रथम पारितोषिक – रोख रु.२०००/- कै. अच्युतराव अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूल विद्यार्थी द्वितीय पारितोषिक – रोख रु.१५००/- ए.टी.झांबरे विद्यालय, तृतीय पारितोषिक – रोख रु.१०००/- विद्या विकास मंदिर *उत्तेजनार्थ प्रत्येकी रु. ५००/- ची तीन पारितोषिके* :- अनुक्रमे ब.गो. शानबाग विद्यालय, विद्या विकास मंदिर आणि या.दे.पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले.
*महिला साहित्य अभिवाचन स्पर्धेतील पुरस्कारार्थी*
प्रथम पारितोषिक – रोख रु.१५००/- पल्लवी कुलकर्णी , द्वितीय पारितोषिक – रोख रु.१०००/- नेहा वंदना सुनील पवार तृतीय पारितोषिक – रोख रु.५००/- रसिका मुकुंद ढेपे, उत्तेजनार्थ – ( प्रत्येकी रोख रु.५००/- ची तीन पारितोषिके ) – अनुक्रमे अनघा प्रवीण गगडानी, आदित्य गिरीश कुलकर्णी,स्मिता चव्हाण यांना मा. प्रमुख अतिथी डॉ.मुकुंद करंबेळकर,कार्याध्यक्ष सी.ए.अनिलकुमार शाह, चिटणीस प्रा.सौ.शुभदा कुलकर्णी,महिला बाल समिती निमंत्रक शिल्पा बेंडाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक शिल्पा बेंडाळे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. मुकुंद करंबेळकर यांनी आपल्या भाषणात अभिवाचन म्हणजे काय या सबंधी सविस्तर माहिती देऊन समयोचित टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या. अभिवाचानासाठी संहीतेच्या निवडीचे महत्त्वही त्यांनी सांगितले.परीक्षकांतर्फे प्रिया सफळे व मंजुषा भिडे यांनी मनोगत व्यक्त केले.वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए, अनिलकुमार शाह यांनीही कार्यक्रमाच्या अनुषंगाने यथोचित मनोगत व्यक्त केले. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. मुकुंद करंबेळकर यांचा सत्कार वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए, अनिलकुमार शाह यांनी ग्रंथ व पुष्पगुच्छ भेट देऊन केला. सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री माया ताई धुप्पड यांचा सत्कार शुभदा कुलकर्णी यांनी केला.परीक्षक मंजुषा भिडे,वैशाली पाटील, सुबोध सराफ,प्रिया सफळे यांचा सत्कार ग्रंथ भेट देऊन करण्यात आला. कवयित्री मायाताई धुप्पड यांच्यातर्फे स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना स्वलिखित कविता संग्रह व कथासंग्रह सस्नेह भेट दिले. सर्व सहभागी स्पर्धक विद्यार्थी व महिलांना सहभाग प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लिना लेले, प्रणिता झांबरे,ग्रंथपाल अनिल अत्रे यांनी विशेष परिश्रम घेतल्या बद्दल वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलकुमार शाह व शुभदा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वाचनालयाच्या कार्यकारी मंडळ सदस्य संगीता अट्रावलकर, प्रभात चौधरी, समिती सदस्य स्वाती ढाके, तसेच शिक्षक विद्यार्थी,महिला व पालक , वाचनालयाचे कलारसिक वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.