भुकेला हरविणारा विचारवंत साने गुरुजी !!!
महाराष्ट्र मध्ये अनेक विचारवंत, साहित्यिक, समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यात साने गुरुजींचे नाव महत्वपूर्ण आहे. कोकणच्या हिरवळीतून आलेला मेहनती श्याम खानदेशात येऊन क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी बनला. कोकणच्या भूमीत सदाशिव साने व यशोदाबाई यांच्या पोटी या नर रत्नाचा जन्म 24 डिसेंबर 1899 साली झाला. पालगड साने गुरुजींचे मूळ गाव होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पालगड मी सुंदर गाव वसलेले होते. साने गुरुजींचे घराणे पूर्वी खोताचे काम करायचे. कालांतराने परिस्थिती बदलली सदाशिव साने यांना हलाखीत जीवन जगावे लागले. गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण घेत श्याम मोठा होत होता. आई यशोदा मानवतेचे संस्कार त्याच्यावर करीत होती. श्यामचा स्वभाव भित्रा होता. आईने श्यामला धाडसी बनवले. संस्काराबरोबर श्याम स्वावलंबी बनला. आईने श्यामला होण्यासाठी प्रवृत्त केले. शामला यशोदा माता खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाला लाभलेल्या यशोदा माता सारखीच संस्कार होते. जीवनाचे सार आईने श्यामला लहानपणीच शिकवलेले होते. श्यामला दुसऱ्यासाठी , देशासाठी झिजणे शिकवले तेच श्यामने आयुष्यभर आपल्याकडे असलेले देण्याचा मरेपर्यंत प्रयत्न केला. श्यामचे प्राथमिक शिक्षण पालगड शाळेत झाले. श्यामच्या घरची परिस्थिती अगदी बेताची होती. परिस्थितीमुळे शाळेतील फि भरणे सुद्धा कठीण जात होते. साने गुरुजींचे माध्यमिक शिक्षण दापोलीला झाले. आपल्या आत्याच्या घरी चार वर्ष राहून श्यामने आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सदाशिव सानेंची खूप इच्छा होती की साने गुरुजींनी खूप शिकावं व त्याने घराची परिस्थिती बदलून टाकावी. पुढील शिक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील औंध वस्तीगृह असल्याने श्यामला साताऱ्याच्या वस्तीगृहात पाठवले. आपल्या वडिलांचे फाटलेले, तुटलेले कपडे व दयनीय परिस्थिती दिसू नये. कुणी आपल्या परिस्थितीची टिंगळ करू नये यासाठी वडिलांना शाळा व वस्तीगृहाच्या बाहेरच भेटायला सांगत. शिक्षणासाठी माधुकरी मागितली. एक वेळचे जेवण केले. आपला मित्र रामच्या घरी अर्धपोटी जेवण करून दिवस काढले. कधीकधी श्याम जेवण सुद्धा करीत नसे. भुकेला दूर ठेवणारा, पराभूत करणारा शिक्षणासाठी अहोरात्र झटला. पुण्याच्या महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेऊन तत्त्वज्ञानाची पदवी घेण्यासाठी अमळनेरात श्यामचे आगमन झाले. अमळनेरला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबरोबर प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. परिस्थितीला हरवणारा श्याम कवी, लेखक, तत्त्वचिंतक बनला. आईने दिलेले संस्कार विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये गिरवत होता. मुलांना सर्वगुणसंपन्न बनवत होता. बालकरुपी रोपट्यावर मानवतेचे सिंचन करित होता. 1930 च्या दरम्यान स्वातंत्र प्राप्तीसाठी विविध चळवळी जोर धरू लागल्या होत्या. साने गुरुजींना वाटले की आपण जिवंत असताना या मायभूमीसाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे यासाठी साने गुरुजींनी महात्मा गांधीजींचे भाषण ऐकल्यावर निर्णय घेतला की आता यापुढे श्याम हा देशासाठी असणार त्यामुळे अमळनेरातील शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला. मुलांची जीवन फुलविणारा माळी म्हणजे साने गुरुजी होय. साने गुरुजींनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले. स्वातंत्र्यलढ्यात पूर्णपणे झोपून दिले. आपल्या लेखनातून ७० च्या वर पुस्तके लिहिली. आपल्या शब्दाने लोकांना भुरळ पाडली. आपल्या कवीतेने लोकांच्या मनात स्वातंत्र्यासाठी झोकून देण्याची वृत्ती निर्माण केली. सोप्या शब्दात परंतु श्रीमंत शब्दाने , आशय घन शब्दाने विचार दिले. साने गुरुजींनी अमळनेरच्या भूमीत स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली. अमळनेरातील तरुण मल्हारी चिकाटे ह्या तरुणाचे मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी दिलेले योगदान याबाबत अमळनेरकरांना त्या तरुणाचे कौतुक करून त्याचा रक्ताने माखलेला सदरा दाखवून अमळनेरच्या जनतेला जागृत केले. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी असंख्य प्रेरणादायी गीते लिहिली. त्यामध्ये बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, आता उठवू सारे रान, खरा तो एकची धर्म असे गीते लिहून लोकांच्या देशभक्तीची ठिणगी पेटविली. त्यांनी लिहिलेल्या गीतांची पत्रावळी प्रसिद्ध आहे . माणसांना कृतीशील बनविणारी त्यांची वाणी होती. शांत, निरव, निरागस, सालस, नम्र, शील ही त्यांची आभूषणे होती. प्रेमाने जग जिंकता येते ह्या उक्तीप्रमाणे ते जगले. कोणत्याही सेवाभावी कामाची त्यांनी कधीही लाज बाळगली नाही. जिथे गेले तिथे झाडू घेऊन स्वच्छता केली. शौचालय साफ केली. मी मोठा मी हे काम काम करायचे असा अहंभाव त्यांनी कधी ठेवला नाही. फैजपूर च्या अधिवेशनावेळी लोकांसाठी भाकरी थापलया, शौचालय साफ केली. प्रताप हायस्कूलच्या वस्तीगृहात मुलांचेही वेळ प्रसंगी कपडे धुणारा गुरुजी हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल.. मुलांच्या फि भरण्यासाठी एक वेळचे जेवण करून एका वेळच्या पैशातून विद्यार्थ्यांची फि भरीत होते. भाकरीसाठी कुणापुढे लाचार झाले नाही. स्वाभिमान अखेर पर्यंत जपला. साने गुरुजींनी वैचारिक प्रबोधनासाठी, संस्कारासाठी साधना हे मासिक सुरू केले. त्यामुळे मुलांचे भावविश्व फुलले. साधी राहणी उच्च विचार अशी उच्चतम जीवनसरणी होती. मुलांच्या हृदयापर्यंत जाणारी त्यांची लेखणी होती. साने गुरुजी आईचे हृदय असलेले गुरुजी होते. त्यामुळे त्यांना मातृहदयी साने गुरुजी म्हणून ओळखली जाते. साने गुरुजींनी भारतीय संस्कृती या पुस्तकात धर्म म्हणजे उच्चतम कर्म सिद्ध करणे असे म्हटले आहे. कोणताच धर्म वाईट नसतो . धर्माने प्रेम वाढले पाहिजे. माणुसकी जपली पाहिजे. धर्माने हिंसा घडत असेल तर तो धर्मच नव्हे असे म्हटले आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर साने गुरुजींनी अत्यंत मार्मिक पुस्तक लिहिले आहे. साने गुरुजींनी सामाजिक कामे सुद्धा केली. शेतकऱ्यांसाठी उठाव केले. हरिजनांना पंढरपूरचे मंदिर खुले करण्यासाठी उपोषण केले. साने गुरुजी महत्व देशाला स्वातंत्र्य मिळणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. प्रत्येक मानवाला मुक्तपणे जगता यावे याला खरे स्वातंत्र म्हणतात. साने गुरुजींनी खऱ्या अर्थाने धर्म समजावून सांगितला. अशा या महानपुरुषास विनम्र अभिवादन
एस.एच.भवरे
उपसंपादक
लेखन मंच साप्ताहिक अमळनेर
९०७५४१७०३२