महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !….
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला सामाजिक शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते – जीवनसिंह बयस
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रस्ताविक शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशनचे अध्यक्ष जीवनसिंह बयस, उपाध्यक्ष तेजेंद्र चंदेल, सचिव मुकेशसिंह बयस, राजेंद्र पडोळ, गोविंदभाई पुरभे, प्रवीण पाटील, धीरेंद्र पुरभे, दुर्गेश बयस उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या वतीने आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या वाटप करण्यात आले. राजेंद्र पडोळ यांनी मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन ची सामाजिक कार्य विशद करत दरवर्षी आमची संस्था शहरातील गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पेन, स्कूल बॅग, साईकल, शैक्षणिक साहित्य वाटप करीत असतो याचा फायदा गोरगरिबांना होतो याचा संस्थेला आनंद आहे. यावर्षी देखील महात्मा फुले हायस्कूल शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जीवनआप्पा बयस यांनी वर्ग ९ वी व १० वी चे ५ – ५ पुस्तकांचे संच दिला, ५० पाट्या , वह्या असे शैक्षणिक साहित्य दिले. सामाजिक कार्यकर्ते धिरेंद्र पुरभे यांनी पुस्तकांचे ५ संच देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी मंगलादेवी व मुन्नादेवी फाउंडेशनचे सामाजिक व शैक्षणिक कार्य खूप मोठे आहे आणि त्यांनी केलेले दातृत्व आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व पुढे घेऊन जाणारे आहे त्यांनी आमच्या शाळेवर असेच प्रेम करावे आणि मंगलादेवी व मुन्नादेवी संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.