मराठी पत्रकार परिषदेच्या भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्काराने
अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडूरंग पाटील
ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित
अमळनेर- येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना काल आझाद मैदानाजवळील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी खासदार राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष नेते महाराष्ट्राचे ‘जाणता राजा’ शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते अकोला येथील पत्रमहर्षि भगवंतराव इंगळे यांच्या नावाचा प्रतिष्ठेचा स्मृती पुरस्कार सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार विचारवंत मधुकर भावे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महेश म्हात्रे, ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा जयपुरकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजाभाऊ आदाटे, परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सुरभाई शेख, डिजीटल मिडीयाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थित होती.
पांडुरंग पाटील यांच्या नि:स्पृह व विधायक पत्रकारितेचा संयोजक व उत्कृष्ट सुत्रसंचालक व परिषदेचे उपाध्यक्ष आयबीएन लोकमतचे विशाल परदेशी यांनी आपल्या निवेदनात विशेष उल्लेख केला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांचे चरण स्पर्श करण्यासाठी पांडुरंग पाटील हे गेला असता त्यांनी ओळखले व नाव घेऊन शुभाशिर्वाद देत ‘लोकमत’ मधील अमळनेरच्या त्यांच्या बातमीदारीची विशेष आठवण दिली. 70 वर्षीय पांडूरंग पाटील हे उच्चविद्याविभूषित असून 50 वर्ष प्रदिर्घ पत्रकारितेचा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी धुळे येथील ‘स्वतंत्र भारत’ पासून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर ‘आपला महाराष्ट्र’, ‘वार्ता’, ‘दैनिक लोकमत’, स्वत:चे साप्ताहिक ‘दिनानाथ’ सह सध्या ‘दैनिक पुण्यप्रताप’ चे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शेतकरी, कामगारांचे प्रश्न राजकारण समाजकारण, शैक्षणिक तसेच सगळ्या विषयांचे स्फूट लिखाणातून ते सिद्ध केले आहे. हा पुरस्कार त्यांनी त्यांच्या पत्नी सौ. विजया पाटील, मुले नंदकिशोर, हेमेंद्र या परिवारासह राज्यभरातून आलेल्या पत्रकारांच्या उपस्थितीत स्विकारला. या दिमाखदार, देखणा व अप्रतिम बहारदार सत्कार समारंभ सोहळ्यास खान्देशातून जळगावच्या दैनिक पुण्यप्रतापचे संपादक भाऊसाहेब विवेक पाटील अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष गो. पि. लांडगे, धुळे नंदुरबार एकसंघ जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बापू ठाकूर, धुळे येथील ‘सा. जागृतीपर्व’ चे संपादक दत्ताजी बागुल यांनी उपस्थित राहून पांडुरंग पाटील यांना शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पांडूरंग पाटील यांचे अमळनेर सह संपूर्ण खान्देशातून विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.