कॉलनीत समस्यांचा स्फोट – नागरिकांचा प्रशासनाला जाब!”
“सुविधांशिवाय घरपट्टी वाढ! शिवशक्ती कॉलनीतील नागरिकांचा संताप उफाळला – आंदोलनाची तयारी!”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिवशक्ती कॉलनी परिसरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार आवाज उठवला आहे. वाढीव घरपट्टी लागू करूनही नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून कुठेही सुरळीत चालता येत नाही. गटारी वर्षभरापासून साफ न झाल्याने परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. कचरा घंटागाडीही वेळेवर येत नाही, तसेच त्यावर असलेली व्यक्ती सहकार्य न करता नागरिकांशी उद्धट वर्तन करते, असा आरोप करण्यात आला आहे.
पिण्याच्या पाण्याचा वेळही ठरलेला नाही – कधी सकाळी, कधी दुपारी, कधी रात्री – यामुळे लोकांना आपले कामधंदे सोडून पाण्यासाठी थांबावे लागते. मोकाट जनावरांच्या त्रासामुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
यासंदर्भात परिसरातील रहिवाशांच्या वतीने उत्कर्ष पवार, विकास चौधरी, पराग चौधरी, भूषण जोशी व पावरा सर यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना अधिकृत निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी वरील सर्व समस्यांचा सविस्तर उल्लेख करत, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर लवकरच या समस्यांचा निपटारा झाला नाही, तर नागरिक आंदोलन व उपोषणाचा मार्ग पत्करतील, व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर असे उत्कर्ष पवार ,विकास चौधरी ,पराग चौधरी, भूषण जोशी ,पावरा सर, अनिल पाटील ,किरण पाटील ,हर्षल पाटील, बबन चौधरी, सुखदेव पाटील ,प्रकाश चौधरी ,ब्रिजलाल पाटील ,प्रल्हाद पाटील ,रवी चौधरी ,प्रल्हाद बेलदार, संजय पाटील ,चेतन पाटील ,गिरीश शिंदे ,प्रशांत रणदिवे ,मुकुंद गुरव ,भावेश चौधरी ,पराग चौधरी ,ब्रिजलाल पाटील सह अनेकांच्या निवेदनावर सह्या आहेत