• Fri. Jul 11th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

रस्त्याची दुरूस्ती करा, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

Jul 9, 2025

Loading

रस्त्याची दुरूस्ती करा, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी
: रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती केली नसल्याने पावसाच्या पाण्याने चाळण झालेल्या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा अमळनेरातील ओमकार नगरातील नागरिकांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून शहरात भुयारी गटार तसेच पाइपलाइनचे काम करणे सुरू आहे. यामुळे शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यापुर्वी या रस्त्यांची दुरूस्ती होणे अपेक्षित होते, मात्र पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने तसेच कंत्राटदारच्या मनमानी कारभारामुळे रस्ते दुरुस्तीचे कामे पावसाळा सुरू होऊनही अर्धवटच आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील रस्ते चिखलमय होऊन रस्त्यांची अक्षरश: अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. नागरिकांना पायी देखील चालणे मुश्किल झाले आहे. वाहनधारकांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे.
येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिर ते टाकरखेडा रस्त्यादरम्यानही ओमकार नगरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरीत डागडुजी करुन दुरूस्ती करावा अन्यथा पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन ओमकार नगरवासियांनी पालिका प्रशासनाला दिले आहे.
निवेदनावर डॉ. डिगंबर महाले, धनंजय सोनार, नामदेव कुंभार, केशव नेमाडे, परशुराम बिऱ्हाडे, अंजना गुरव, किरण चव्हाण, महेंद्र चौधरी, जयश्री कोळी, मंगला कुंभार, रुपाली महाले, ममता महाले, नरेंद्र सोनार, साईकुमार सोनार, राजश्री सोनार, ओमकुमार सोनार, राहुल धनगर, प्रविण पाटील, विनोद मगर, कैलास न्हावी, जितेंद्र पाटील आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *