
महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य”
“महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य”
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
गेल्या काही दिवसांपासून वाघोदे परिसरात पंचायत समितीच्या उमेदवारीसंदर्भात विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच, दिपक पाटील यांच्या पक्षप्रवेशावरही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यांच्यावर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यास अडथळा येतोय की काय, अशी कुजबूज होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दिपक पाटील यांनी स्वतः खुलासा करत स्पष्ट केलं की, “माझं वरीष्ठ नेत्यांशी बोलणं झालं असून, मी महाविकास आघाडीच्याच माध्यमातून निवडणूक लढविणार आहे. पक्षप्रवेश रखडण्याचं कारण म्हणजे जानवे-मंगरूळ गटासाठी जागा अंतिम होत नाही, त्यामुळे प्रतीक्षा सुरू आहे.”
तसेच त्यांनी हेही नमूद केलं की, “कै. आण्णासाहेब अर्जून पाटील यांच्या पुण्याईमुळे जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो मी कधीच विसरू शकत नाही. माझी निष्ठा कायम महाविकास आघाडीकडेच राहणार आहे.”
याशिवाय, जिल्हा परिषदेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून देखील ऑफर मिळाल्याचे त्यांनी मान्य केलं. मात्र, “त्या संदर्भात मी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
या निवेदनानंतर राजकीय वर्तुळातील तर्कवितर्कांना काहीअंशी विराम मिळाला असला, तरी पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.