
“राजकीय भूकंपाची शक्यता: अनिल दादा बनतील का नवे कृषी मंत्री?”
“कोकाटेंच्या राजीनाम्याच्या चर्चेत आमदार अनिलदादा पाटील यांना कृषी खात्याची संधी? अमळनेरच्या विकासासाठी नवे आशादायक संकेत!”
अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या विविध आरोपांच्या भोवऱ्यात अडकले असून, विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर सातत्याने प्रश्नांची सरबत्ती होत आहे. त्यामुळे त्यांना लवकरच राजीनामा द्यावा लागेल का, अशी जोरदार चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कृषी खाते हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार अनिल दादा पाटील यांच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अनिल दादा पाटील यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्यातील विकासकामांना गती देताना उल्लेखनीय कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे जर कृषी मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली, तर जळगाव जिल्हा व अमळनेर तालुक्याला न्याय मिळून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा शेतकरी व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांचा निर्णय काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अनिल दादा पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यास अमळनेरच्या प्रलंबित योजनांना चालना मिळून तालुक्याचा विकास अधिक वेगाने होईल, हेही तेवढंच खरे आहे.
राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये सध्या हीच चर्चा रंगली आहे की, ‘कोकाटेंच्या जागी दादांची एंट्री?'”