
अमळनेरातील वाढीव मालमत्तांची फेर मोजणी करून नागरिकांचे पूर्ण समाधान करा 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार-आढावा बैठकीत आ.अनिल पाटील यांच्या पालिकेला सूचना
अमळनेरातील वाढीव मालमत्तांची फेर मोजणी करून नागरिकांचे पूर्ण समाधान करा
10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार-आढावा बैठकीत आ.अनिल पाटील यांच्या पालिकेला सूचना
अमळनेर-शहरातील वाढीव मालमत्तां धारकांना दिलेल्या बिलाच्या नोटिसा नागरिकांना अवाजवी वाटत असल्याने आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्या सर्व मालमत्तांची फेरमोजणी करा व त्यांचे पुर्णपणे समाधान होत नाही तोपर्यंत कोणतीही वसुली अथवा अन्य निर्णय घेऊ नका, तसेच 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी तातडीने शासनाकडे पत्रव्यवहार करा यासाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करणार अशा सूचना माजी मंत्री तथा आ.अनिल पाटील यांनी पालिकेच्या आढावा बैठकीत दिल्या.
आमदार पाटील यांच्या कार्यालयात सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील व मुख्याधिकारी तुषार नेरकर उपस्थित होते. सुरवातीला अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी वाढीव करा संदर्भात झालेली सर्वपक्षीय सहविचार सभा आणि पालिकेत झालेल्या बैठकीत आलेल्या मुद्द्यांचा आढावा मांडून नागरिकांनी केलेल्या अपेक्षांना आमदारांनी व पालिकेने न्याय द्यावा अशी विनंती केली.
या केल्यात आमदारांनी सूचना
आमदार पाटील यांनी प्रत्येक मागणीवर सकारात्मक तोडगा काढत काही स्पष्ट सूचना केल्या त्यात त्यांनी वाढीव मालमत्ता धारकांना कर कक्षेत घेण्यास कुणाचाही विरोध नाही मात्र खाजगी संस्थेच्या सर्वेक्षण नुसार अनेकांना अवाजवी रकमेच्या नोटिसा दिल्याच्या तक्रारी माझ्याकडेही आल्या आहेत. यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांकडून फेरमोजणी करा,आणि नागरिकांचे पुर्णपणे समाधान झाल्यानंतरच पुढील वसुलीची प्रक्रिया राबवा तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका.तसेच खाजगी संस्थेने मोजणी केली असली तरी जुन्या कोणत्याही मालमत्ता धारकांना वाढीव कर लावण्याचा निर्णय घेऊ नका.पाणीपट्टी वर 2 टक्के व्याज आकरायचेच असेल तर ते 31 मार्च नंतरच आकारले जावे यासाठी आपल्या धोरणात बदल करा.मालमत्ता हस्तांतरणसाठी 2 टक्के आकारणी ही खरंच जास्त असून यामुळे कुणीही पालिकेच्या कर पावतीवर आपले नाव लावून घेत नाहीत,यासाठी मालमत्ता खरेदी केलेल्या वर्षात म्हणजे मार्च पर्यंत हस्तांतरण केल्यास अर्धा टक्का अश्या पद्धतीची सवलत देण्याचा निर्णय घ्यावा अशी सूचना त्यांनी केली.
याव्यतिरिक्त शहराच्या हद्द वाढीचा आढावा आमदारांनी घेतला.पाणीपुरवठा विभागा बाबत आलेल्या तक्रारीवर काही सूचना केल्या.शासकीय इमारतींवर सोलर बसविण्या बाबतचा आढावाही त्यांनी घेतला.घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाच्या कामकाजावर मात्र त्यांनी नाराजी व्यक्त करून आठ दिवसात सुधारणा न झाल्यास कारवाई करा अश्या सुचना दिल्यात.
यावेळी माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील तसेच माजी नगरसेवक राजेश पाटील,नरेंद्र चौधरी, मनोज पाटील,मुक्तार खाटीक, नरेंद्र संदानशिव,विनोद लांबोळे,विक्रांत पाटील व दीपक पाटील आदींनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी वर्गाने समाधानकारक उत्तरे दिलीत.सदर बैठकीस सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
महायुती पदाधिकाऱ्यांनी दिली उपस्थिती,,
सदर बैठकीत राष्ट्रवादी सह भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व असंख्य माजी नगरसेवक आवर्जून उपस्थित होते.यात प्रामुख्याने ऍड व्ही आर पाटील,हिरालाल पाटील,शितल देशमुख,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे,शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील,गोविंदा बाविस्कर, तुषार संदानशिव,बाळू पाटील, , आशिष चौधरी,माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार,रामकृष्ण पाटील, संजय कौतिक पाटील,प्रताप शिंपी,विवेक पाटील,ऍड यज्ञेश्वर पाटील,प्रविण महाजन, रावसाहेब पाटील,बाळू पाटील यासह अन्य पदाधिकारी आणि पत्रकार किरण पाटील,जितेंद्र ठाकूर,आर जे पाटील,चंद्रकांत पाटील,पांडुरंग पाटील,बाबूलाल पाटील,महेंद्र पाटील,मुन्ना शेख, डॉ विलास पाटील उपस्थित होते.
सकारात्मक निर्णय घेणार
आढावा बैठकीत आमदार साहेबांनी काही महत्वपूर्ण सूचना पालिकेला केलेल्या आहेत.त्याबाबत विस्तृत अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.नागरी हिताचेच धोरण आपल्या नगरपरिषदेचे असून नागरिकांनीही सहकार्य करावे.
तुषार नेरकर, मुख्याधिकारी,
नगरपरिषद, अमळनेर