
विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस अमळनेरमध्ये सेवाभावी उपक्रमाने साजरा गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप आणि स्वादिष्ट भोजन
विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस अमळनेरमध्ये सेवाभावी उपक्रमाने साजरा
गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप आणि स्वादिष्ट भोजन
अमळनेर (ता. २४ जुलै) –
जगप्रसिद्ध आयटी क्षेत्रातील विप्रो कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस त्यांच्या मूळगावी, अमळनेर येथे सेवाभावी उपक्रमाने साजरा करण्यात आला. सुनिलभाऊ चौधरी व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या उपक्रमात ४०० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट भोजनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. या वेळी राजाराम चौधरी, चेतनजी थोरात (HR, विप्रो), जितेंद्र शर्मा (फॅक्टरी मॅनेजर), भोजुशेठ माहेश्वरी यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारे कार्य म्हणून गौरव केला.
या कार्यक्रमात कु. ललिता हरित पिंजारी (पिळोदा), वैष्णवी योगेश पाटील (जानवे), लकी रवींद्र भोई (अमळनेर), जयेश निंबा पाटील (लोंढवे) यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रभावी भाषण करून अजीम प्रेमजी यांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकला. “भविष्यात आम्हीही गरजूंना मदतीचा हात देऊ,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी चेतनजी थोरात म्हणाले, “अजीम प्रेमजी हे केवळ उद्योगपती नाहीत तर शिक्षण, आरोग्य व समाजसेवा यामध्ये दीपस्तंभ आहेत. विप्रो ही एक मूल्यांची शाळा आहे. त्याच ध्येयाने सुनिलभाऊ चौधरी कार्यरत आहेत. अशा उपक्रमांना आमचा कायमचा पाठिंबा राहील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीष चौक यांनी केले, तर आभार मुरली चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या उपक्रमासाठी सुनिलभाऊ मित्र परिवारासोबत पालक, शिक्षक व स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.