
आवार येथे ग्रंथदान देऊन अक्षर दिवाळी सृजनशील उपक्रम संपन्न
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचा प्रेरक उपक्रम
छंद व अभिरुची शून्य लहान थोरांच्या मनातील अंधार नष्ट करणे.विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात ध्येयाचे व स्वप्नांचे नंदादिप प्रज्वलित करून अंतर्मन प्रकाशमय करून परमानंदाचा अक्षय दीपोत्सव निरंतर करण्याच्या उद्दिष्टाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ. मायाताई दिलीप धुप्पड व पत्रकार लालचंद अहिरे यांच्या प्रेरणेने आणि निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांच्या मागदर्शनाने दर्जेदार ग्रंथदान करून अक्षर दिवाळी फराळ अभिनव उपक्रम बालदिनाच्या औचित्याने उत्साहात साजरा करण्यात आला.
मंगळवार दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजी आवार या आदर्श खेडेगावातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार ग्रंथदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोकुळ सपकाळे असून प्रमुख अतिथी उपसरपंच सौ.सुरेखा बाविस्कर,अंनिसचे ज्येष्ठ राज्य पदाधिकारी प्रा.दिगंबर कट्यारे ,जिल्हा कार्यकर्ते शिरीष चौधरी सर व जितेंद्र धनगर,प्रा.आनंद ढिवरे,बँक सखी चंदागिरी चौधरी,बचत गटाच्या मोहिनी सपकाळे,आशा वर्कर आशा सपकाळे,माजी सरपंच सुनिल सपकाळे,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय सपकाळे,सुलोचना सपकाळे मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी ग्रंथ पूजन करून महात्मा फुले लिखित प्रार्थनेचे सामुहिक अनुगायन करण्यात आले.प्रास्ताविकेत भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी ‘ ग्रंथदान देऊन अक्षर दिवाळी साजरी करणे ‘ या सृजनशील उपक्रमाची संकल्पना सांगितली.या उपक्रमासाठी ग्रंथदान करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री सौ.मायाताई दिलीप धुप्पड यांचा साहित्यिक तथा पाठ्यक्रमिक पुस्तकाच्या कवयित्री म्हणून परिचय आणि त्यांच्या वांग्मयीन कर्तृत्वाचा पुरस्कारांसह उत्तुंग आलेख संयोजक लुल्हे यांनी संक्षेपाने सादर केला. मायाताईंच्या राज्य पुरस्कृत ‘ सावल्यांचं गाव ‘ काव्यसंग्रहातील आजोबा आजोबा व रंगांचे गाणे या कविता लुल्हे यांनी सादर करून सुगम भाषेत आशय विश्लेषण केले.राज कोळी,प्रगती सपकाळे,प्रेम सोळुंके या विद्यार्थ्यांनी काही धुप्पड यांच्या निवडक कवितांचे अनुवाचन केले.
बाल साहित्यिका सौ.मायाताई दिलीप धुप्पड यांचे ग्रंथदानातील अमूल्य योगदान
पाच राज्य पुरस्कार प्राप्त ‘ सावल्यांचं गाव ‘ या कविता संग्रहा सोबत ‘ नाच रे बाळा ‘,’ बेडूक बेडूक ‘, ‘ अनमोल भेट,’ गीतनक्षत्र ‘, ‘भक्तीनिनाद ‘ या काव्यसंग्रहांच्या ५० प्रति त्यांनी ‘ चला वाचूया ‘ या स्वतः च्या संकल्पित प्रकल्पा अंतर्गत ग्रंथदान फराळ उपक्रमासाठी वात्सल्याने उपलब्ध करून दिल्या.
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाराचा हात घ्यावा
या कवी विंदा करंदीकर यांच्या प्रेरक काव्यपंक्तीनुसार कवयित्री मायाताई धुप्पड यांच्या प्रेरणेतून विजय लुल्हे प्रभावित झाले.विजय लुल्हे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाई,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी चरित्रांची पुस्तके तसेच साने गुरुजी लिखित ‘ श्यामची आई ‘ कादंबरी अशी वाचनीय २५ पुस्तके ग्रंथदानाच्या दिवाळी फराळासाठी दिली.विद्यार्थ्यांच्या अभिरुची संवर्धनासाठी पाठ्यक्रम कवी लेखकांचे कार्यक्रम तसेच कथाकथन पुस्तक भिशी तर्फे सादर करण्यात येतील असे विनम्र आश्वासन दिले.
आदर्श गावाचे शिल्पकार तथा आवारचे सरपंच माननीय गोकुळ सपकाळे यांचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे संस्थापक विजय लुल्हे यांनी शाल व ग्रंथ देऊन हृद्य सत्कार केला तसेच महिलांचे संघटन व व्यावसायिक मार्गदर्शन उत्कृष्ठ कार्यासाठी बँक सखी चंदागिरी चौधरी यांचे ‘ श्यामची आई ‘ व अन्य ग्रंथ देऊन विजय लुल्हे यांनी भावपूर्ण सत्कार केला.
तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दर्जेदार ग्रंथदान देऊन अक्षर दिवाळी अभिनव पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सुटीत अनपेक्षित वाचनीय पुस्तकांचा खजिना प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता ! प्रा.दिगंबर कट्यारे व प्रा.आनंद ढिवरे यांनी शास्त्रीय प्रयोग करून त्यामागील कार्यकारणभाव लक्षात आणून देत अंधश्रद्धा नसतातच हे सांगून हसत खेळत प्रबोधनाने कार्यक्रमाची सांगता केली.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जितेंद्र धनगर यांनी केले.कार्यक्रमास सुरेंद्र सपकाळे छाया सपकाळे,अलका सपकाळे,धीरज सोनवणे,चेतन सपकाळे, पांडुरंग सोनवणे,विशाल सपकाळे यांसह सुजाण नागरिक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.