अंगणवाडी सेविकांना एफआरएस ची सक्ती बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू – रामकृष्ण बी.पाटील
अमळनेर प्रतिनिधी
राज्यासह जिल्ह्यातील सेविकांना
एफ आर एस करण्याची सक्ती केली जात असून मानधन कपातीच्या आणि कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत सदर धमक्या व सक्ती तातडीने बंद करण्यात यावी.अशी मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केली आहे.
मध्यवर्ती शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी पोषण ट्रॅक्टर एप्लीकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी शासनाने पोषण ट्रॅक्टर एप्लीकेशन मध्ये एफ आर एस प्रणाली सुरू केली आहे.
परंतु सदर प्रणाली अनेक तांत्रिक अडचणी व दोष आहेत. सदर अडचणींमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न वारंवार करूनही एफ आर एस प्रणाली मध्ये माहिती अद्यावत भरली जात नाही.
तसेच लाभार्थ्यांच्या पालकांकडे आधार कार्ड नसणे,आधार कार्ड अपडेट नसणे,मोबाईल नंबर लिंक नसणे,मोबाईल नंबर बदल झालेला असणे अशा प्रकारच्या अडचणी असतानाही अंगणवाडी सेविका एफआरएस साठी पुरेपूर प्रयत्न करीत आहेत.
असे असूनही काम न झाल्यास मानधनात कपात आणि प्रशासकीय कार्यकारी कारवाई करण्याच्या धमक्या काही मुख्यसेविकांकडून दिल्या जात असल्यामुळे सेविकांचे मनोधैर्य खचत आहे.एफआरएस मधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. यासाठी संघटना वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करीत आहे. असे असताना सदोष अप्लिकेशन मध्ये FRS करण्याची अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सक्ती करणे तसेच धमक्या देणे थांबविण्यात यावे.
अन्यथा एफआरएस च्या कामावर अंगणवाडी सेविका बहिष्कार टाकत जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा श्री. पाटील यांनी दिला आहे.