टाळ्यांच्या गजरात गुरूंना अभिवादन – पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक श्री. उदय पाटील, श्री. अविनाश अहिरे आणि विद्यार्थ्यांनी मिळून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात शाळेत आगमनावेळी स्वागत केले.
सकाळी शाळेची सुरूवातच आनंददायी वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या गुरूंचे पाय धरून आशीर्वाद घेतले. गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण करून देणारा हा सोहळा सर्वांच्या मनात एक वेगळा आनंद निर्माण करणारा ठरला.
या प्रसंगी महर्षी व्यास यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. महर्षी व्यास यांच्या कार्याचा गौरव करतानाच ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करण्यामागील उद्देश, गुरुंचे महत्त्व आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्थान याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून झाले होते, ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व सामाजिक भावनांचा विकास झाला. शाळेच्या शिक्षणासोबतच संस्कारांचाही संगम घडवणारी ही गुरुपौर्णिमा सर्वांच्या मनात कायमची कोरली गेली.