श्री मंगळग्रह मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त लघुरुद्राभिषेक व फुलांनी सजलेली भक्तीमय आरास!
अमळनेर प्रतिनिधी
येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात १० रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरणात यजमान नरेंद्र मधुकर सोनार यांनी सपत्नीक लघु रुद्राभिषेक केला.याप्रसंगी श्री दत्त भगवान व अनघालक्ष्मी माता मंदिर तसेच श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरावर विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्री मंगळग्रह मंदिर परिसरात विश्वातील एकमेव कमंडलूस्थित श्री अनघालक्ष्मी माता व श्री दत्त भगवान मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गणपती पूजन, पुण्याहवाचन करून श्री दत्त भगवान व श्री अनघालक्ष्मी माता यांच्या मूर्तींवर यजमान सोनार दांपत्यांच्या हस्ते रुद्राक्ष सिद्ध करून अभिषेक करण्यात आला. सायंकाळी श्री दत्त भगवान यांच्या महाआरतीने लघु रुद्राभिषेकाची पूर्णाहुती झाली. आता हे सोपस्कारीत व सिद्ध झालेले रुद्राक्ष श्री मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक करणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहेत.
मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, सुनील मांडे, सारंग पाठक, व्यंकटेश कडवे, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, हेमंत गोसावी, शुभम वैष्णव यांनी पौरोहित्य केले. त्यांना गोपाल पाठक यांनी सहकार्य केले.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डीगंबर महाले ,खजिनदार गिरीश कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक भरत पाटील, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रवींद्र मोरे, मंगल सेवेकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.