• Mon. Jul 7th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सहकार पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर* *१८ जुलै पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*

Jun 27, 2025

Loading

*सहकार पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर*

*१८ जुलै पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*

पुणे,दि.२७ : राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकार पुरस्कारासाठी संस्थांची निवड करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सहकारी संस्थांनी १८ जुलै २०२५ पर्यंत संबंधित तालुका सहायक निबंधक, उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केले आहे.

या पुरस्कारांतर्गत ‘सहकार महर्षी’ पुरस्कार-१ , ‘सहकार भूषण’- २१ तसेच ‘सहकार निष्ठ’- २३ असे एकूण ४५ संस्थांना पुरस्कार देण्यात येणार असून अनुक्रमे रुपये १ लाख, रुपये ५१ हजार व २५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

पात्र संस्थांच्या निवडीसाठी संस्थाप्रकारनिहाय नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा-तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखापरीक्षण, व दोषदुरुस्ती अहवाल, निवडणूक,व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक, प्रशिक्षण, सादर करावयाची प्रतिज्ञापत्रे यासाठी ५० गुण, संस्था प्रकारनिहाय निश्चित केलेल्या विशेष निकषांसाठी ३५ गुण व सहकारी संस्थेसाठी योगदान, जनतेसाठी दिलेले योगदान, सहकार चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न, सहकारी, सार्वजनिक, धर्मादाय प्रयोजनासाठी केलेली मदतीसाठी २० गुण देण्यात येणार आहेत.

शासन स्तरावरील समितीमार्फत २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत पुरस्कार प्राप्त संस्थांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराविषयी अधिक माहिती सहकार विभागाच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *