• Mon. Jul 7th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राजवड (ता. पारोळा) येथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 अंतर्गत 7 शेत रस्त्यांचे अतिक्रमण मुक्ती उपक्रम; शेतकऱ्यांना सोयीस्कर मार्ग उपलब्द, महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आणि कृषि भूषण साहेबराव पाटील यांच्या पुढाकाराने दोन शेत रस्ते स्वखर्चाने मुक्त; 35 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा

Jun 28, 2025

Loading

राजवड (ता. पारोळा) येथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 अंतर्गत 7 शेत रस्त्यांचे अतिक्रमण मुक्ती उपक्रम; शेतकऱ्यांना सोयीस्कर मार्ग उपलब्द

महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आणि कृषि भूषण साहेबराव पाटील यांच्या पुढाकाराने दोन शेत रस्ते स्वखर्चाने मुक्त; 35 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा

अमळनेर प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील राजवड (आदर्श गाव) येथे शेतकरी व ग्रामस्थांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 143 नुसार आपापल्या शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या शेतमाल वाहतुकीच्या रस्त्यांचे अतिक्रमण मुक्त करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली आहे.
या कलमानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधित कामांसाठी शेतजमिनीचा वापर करण्याचा कायदेशीर अधिकार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी आणि मालवाहतुकीसाठी आवश्यक रस्त्यांचा समावेश होतो. मात्र, अशा रस्त्यांची अधिकृत नोंद भूमापन अभिलेखात नसते, त्यामुळे यावरून वाद निर्माण झाल्यास तहसिलदार यांच्याकडे अंतिम निर्णय करण्याचा अधिकार असतो.
राजवड येथील शेतकरी विविध गटांत विभागलेले असून, ते आपापल्या शेतात जाण्यासाठी 7 महत्त्वाच्या रस्त्यांसाठी ग्रामस्थांनी तहसिलदार श्री डॉ. उल्हास देवरे यांना विनंतीपूर्वक अर्ज दिला. या मागणीवरून कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या पुढाकाराने 7 पैकी 2 रस्त्यांच्या अतिक्रमणमुक्तीसाठी व्यापक लोकसहभागातून काम सुरु केले गेले.
महसूल व वनविभागांच्या शासन निर्णयांनुसार (दिनांक: 4 नोव्हेंबर 1987, 20 मे 2025 व 22 मे 2025) या नाविन्यपूर्ण योजनेला स्थानिक शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. 20 शेतकऱ्यांनी मिळून स्वखर्चाने अंदाजे रु. 60-65 हजार लोकवर्गणी जमा करून 1.5 कि.मी. लांब दोन शेत रस्ते नव्याने तयार केले. या नव्या मार्गांमुळे 35 पेक्षा अधिक शेतकरी, तसेच 50 हेक्टराहून अधिक शेतीचे क्षेत्र मुख्य रस्त्यांशी जोडले गेले आहे.
महसूल प्रशासनाने उर्वरित 5 रस्त्यांच्या अतिक्रमण मुक्तीसाठीही पथक तयार करून ग्रामस्थांच्या सतत मागणीनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असून, पुढील सहकार्य दिले आहे. तहसिलदार श्री डॉ. उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या मोहिमेत शेतकरी, ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
या प्रेरणादायी उपक्रमासाठी कृषि भूषण साहेबराव पाटील व अतिक्रमण मुक्तीमधील सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क सुरक्षित होत असून, शेतीसाठी आवश्यक असलेले मार्ग सुरक्षित झाल्यामुळे शेतकरी जीवनमान सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे.

यांची होती उपस्थिती..

प्रमुख सहभागी कृषिभूषण साहेबराव पाटील – तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, सहाय्यक महसूल अधिकारी श्री महेश जाधव तलाठी राकेश काळे , ग्रामस्थ: हरी बापू, पप्पू सूर्यवंशी, पिंटू मास्तर, सुभाष काका, श्रीमती मैराळे ताई, यशवंत पाटील, नरेंद्र पाटील (छोटू), हादिश खाटीक, संभाजी पाटील, सुकलाल जिभू, वसंत बापू, अशोक नाना, गोकुळ पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, प्रमोद पाटील, सुरेश पाटील, किरण परदेशी, नागेश परदेशी, अरुण पाटील (पिंटू) आदी.
राजवड येथील हा शेत रस्ता अतिक्रमण मुक्तीचा उपक्रम ग्रामीण भागातील जमिनीच्या योग्य वापरासाठी व शेतकऱ्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरला आहे. महसूल प्रशासन व ग्रामस्थांनी मिळून कार्य केलेले हे यश स्थानिक विकासासाठी मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *